वाढत्या रुग्णसंख्येला आळा बसण्यासाठी जनता कर्फ्यू ः तहसीलदार पवार
श्रीगोंदा । विजय उंडे- 03-May, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यात कोरोना महामारीने थैमान घातले असून रोज संक्रमित रुग्णांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील जनतेच्या मागणीमुळे तहसीलदार प्रदिप पवार यांनी बुधवार दि.05 मे ते शुक्रवार दि. 14 मे पर्यंत 10 दिवसांचा कडकडीत बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हावा या हेतूने जनतेने स्वयंम स्फूर्तीने स्वीकारलेला हा जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला असून या कर्फ्यू दरम्यान दवाखाने, वैद्यकीय औषध दुकाने, पेट्रोल व डिझेल पंप (फक्त अत्यावश्यक सेवांसाठीच), दूध संकलन, पिण्याचे शुद्धीकरण पाणी प्रकल्प सुरू राहतील. या दरम्यान इतर सर्व आस्थापने पूर्णपणे बंद राहतील.
तहसीलदार पवार यांनी आवाहन केले आहे की याकाळात कुणीही बाहेर फिरू नये. यापूर्वीच्या अशा निर्णयाला लोकांनी प्रतिसाद दिला असून याही वेळी मिळण्याची संपूर्ण अपेक्षा आहे. संचारबंदी दरम्यान सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दि.10 एप्रिल रोजी श्रीगोंदा तालुक्यातील एकूण बधितांची संख्या 3,913 होती व 45 जणांचा मृत्यू झाला होता. परंतु दि. 10 एप्रिल ते दि.3 मे पर्यंत फक्त 23 दिवसांत 3,013 ने रुग्ण संख्या वाढून एकूण रूग्ण संख्या 6,926 झाली. तर या 23 दिवसात तब्बल 85 जणांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. यात बहुतेक तरुणांचा मृत्यू झाल्याने तालुका खडबडून जागा झाला.
सामाजिक कार्यकर्ते व समाजमाध्यमांवर संपूर्ण लॉकडाऊनची मागणी होऊ लागली. त्याचाच परिणाम म्हणून 10 दिवसांचा कडकडीत बंद पाळण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत.
Comments