गुरुवारपासून पाथर्डीत जनता कर्फ्यू
पिकवलेल्या शेतीमालाचे करायचे काय? शेतकर्यांपुढे प्रश्न
पाथर्डी । वीरभूमी- 04-May, 2021, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यात वाढती कोरोना बाधितांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी आज मंगळवारी दुपारी बैठक घेऊन पाथर्डी शहरासह तालुक्यात आरोग्य सेवा, फक्त अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप व दूध संकलन केंद्र वगळता सर्व बंद पाळण्याच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पाथर्डी शहरासह तालुक्यात दि. 6 मे ते 16 मे असा 10 दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे.मात्र या जनता कर्फ्यूमध्ये भाजीपाला विक्री व शेतीसाठी लागणारे साहित्य विकीची दुकानेही बंद असल्याने शेतकर्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागणार आहे. या जनता कर्फ्यू काळात उत्पादित झालेला भाजीपालाचे काय करायचे असा प्रश्न शेतकर्यांसमोर उभा राहिला आहे.
आज मंगळवारी प्रांताधिकारी यांनी तालुक्यातील मोजके व्यापारी, राजकीय नेते व प्रशासकीय अधिकारी यांची बैठक घेऊन दि. 6 मे ते 16 मे या काळात 10 दिवसाचा जनात कर्फ्यू पाळण्यात यावा अशा सुचना मांडल्या. या सुचना प्रमाणे पाथर्डी पालिकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी व गटविकास अधिकारी यांनी जनता कर्फ्यू पाळण्याच्या सुचना दिल्या आहेत. यामुळे जनता कर्फ्यू काळात आरोग्य सेवा, पेट्रोल पंप व दूध विक्री वगळता किराणा दुकानासह कृषी सेवा केंद्र व इतर अत्यावश्यक सेवा व इतर व्यवसाय बंद ठेवाव्यात अशा सुचना केल्या आहेत.
या सुचना नंतर जनता कर्फ्यूला विरोध सुरू झाला. याबाबत राष्ट्रवादीचे गटनेते आशिया मणियार व माजी नगरसेवक चाँद मणियार यांनी प्रशासनावरच आरोप करत पाळण्यात येणारा जनता कर्फ्यू हा सर्वसामान्यांना त्रासदायक असून कोणतीही सुचना न देता गुरुवार पासून जनता कर्फ्यू पाळण्यात येणार असल्याने सर्वसामान्यांचे हाल होणार असल्याचे सांगत या जनता कर्फ्यूचा प्रशासनाने फेर विचार करावा, अशी मागणी केली.
यानंतर तहसीलदार श्याम वाडकर यांनी पुन्हा सायंकाळी काही व्यापारी व राजकीय प्रतिनिधींची बैठक घेऊन चर्चा केली. कोरोना साखळी तोडण्यासाठी जनता कर्फ्यूची गरज असल्याचे स्पष्ट केले. मात्र दरम्यान किराणा व्यावसायिकांना होम डिलीवरी देण्याची मुभा देण्याचे सांगितले.
सध्या सर्वत्र कडक लॉकडाऊन असल्याने शेतीमालाचे भाव पडले आहेत. त्यातच आता दहा दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर केला असून या काळात फळे व भाजीपाला विक्रीसाठीही बंदी घातली आहे. यामुळे शेतीतून उपलब्ध होणारा रोजगार बुडणार असून शेतकर्यांनाही पिकवलेल्या भाजीपाल्याचे करायचे काय? असा प्रश्न पडला आहे.
तसेच आरोग्य सेवा व पेट्रोल पंप वगळता इतर सर्व बंद केल्यानंतर शेती कामासाठी लागणारे साहित्य कुठून आणायचे, शेतातील भाजीपाला शेतातच सडू द्यायचा का? बुधवारी उघडी असणार्या अत्यावश्यक सेवा खरेदीसाठी फक्त चार तास असल्याने किती मोठ्या प्रमाणात गर्दी होईल? याचा कोणी विचार केला का? या गर्दीतून कोरोना कमी होण्याऐवजी वाढणार नाही का? ज्या व्यक्तीला दररोजच्या खाण्याची भ्रांत त्यांनी दहा दिवसाचा किराणा व अत्यावश्यक वस्तू कशा खरेदी करायच्या असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
मात्र नागरिक शासनाने ठरवून दिलेले नियम न पाळता बेजबाबदारपणे वागत असल्याने कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसल्याने असे निर्णय प्रशासनाला घ्यावे लागत आहेत. यापुढे तरी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments