या बँकेकडून पिक कर्ज घेण्यासाठी करावा लागणार ऑनलाईन अर्ज
अहमदनगर । वीरभूमी- 05-May, 2021, 12:00 AM
सध्या पूर्व मशागतीच्या कामानसाठी शेतकर्यांना पैशाची गरज आहे. यासाठी अनेक शेतकरी पिक कर्जासाठी बँकेत गर्दी करत आहेत. या कोरोना संसर्गाच्या काळात बँकेत गर्दी वाढल्याने सेंट्रल बँकेने आज एक महत्वाचा निर्णय घेतला असून आता यापुढे शेतकर्यांना पिक कर्जासाठी बँकेत जाण्याची गरज नाही. बँकेकडून घेण्यात येणार्या पिक कर्जासाठी शेतकर्यांना आता ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.
याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, कोविड-19 च्या दुसर्या लाटेचा परिणाम सर्व जनतेवर होताना दिसत आहे. हा साथरोग दिवसेंदिवस उग्र रूप धारण करीत आहे. अशा परिस्थिती मध्ये शेतकरी शेतात काम करीत आहे.
या साथरोगामध्ये शेतकरी बँकेत जाऊन पीक कर्ज घेऊ शकत नाही. यावर उपाय म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या मागदर्शनाखाली व राष्ट्रीय माहिती व प्रसारण विभाग (एनआयसी) अहमदनगर तसेच जिल्हा अग्रणी बँक, अहमदनगर (सेंट्रल बँक ऑफ इंडिया) यांच्या माध्यमातून सर्व शेतकरी वर्गासाठी ऑनलाइन पीक कर्जासाठी सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
त्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर खरीप पीक कर्जासाठी अर्ज करावयाचा आहे. https://ahmednagar.nic.in/notice/application-for-crop-loan-2021-22-ahmednagar-district/ या लिंकला अर्ज केल्यानंतर आपण दिलेल्या बँक शाखेकडून आपणास फोन येईल, त्या नंतर पुढील कार्यवाही होईल. त्यासाठी सध्याच्या परिस्थितीमध्ये बँकेत जाण्याची आवश्यकता नाही.
या सेंट्रल बँकेच्या सुविधेमुळे नक्कीच बँकेतील गर्दी कमी होऊन कोरोना संसर्गाला रोखता येणार आहे. यामुळे शेतकरी वर्गामधून समाधान व्यक्त होत आहे.
Comments