श्रीगोंदा ग्रामीण । वीरभूमी- 08-May, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे विनापरवाना हँड सॅनिटायझर बनवून त्याची विक्री करणार्या आरोपीस श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे. श्रीगोंदा पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी विकास गुलाब तिखे (रा. काष्टी) याला अटक करून त्याच्याकडून तयार हँड सॅनिटायझर व त्यासाठी लागणारे कच्चे रसायन असा एकूण 2 लाख 18 हजार 366 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीला अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. 7 मे रोजी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त खबर्यामार्फत माहीती मिळाली की, विकास गुलाब तिखे (रा.काष्टी, ता. श्रीगोंदा) हा अन्न औषध प्रशासनाच्या परवानगीशिवाय बेकायदेशीरपणे हँण्ड सॅनिटायझर (जंतुनाशक) तयार करुन त्याची विक्री मेडीकल, दवाखाना व इतर ठिकाणी करत आहे.
या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागास संपर्क साधुन कारवाई करण्यासाठी औषध निरीक्षक यांच्यासह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या अधिकारी व कर्मचारी यांनी काष्टी-तांदळी रस्त्यावरील शिक्षक कॉलनी जवळ छापा टाकला. यावेळी तेथे पत्र्याच्या शेडमध्ये विकास गुलाब तिखे (वय 28 वर्षे, रा. दत्तचौक, काष्टी) हा त्याच्याकडील टिपाडातील रासायनिक द्रव्याच्या मदतीने निळ्या रंगाचे पाणी व इतर रसायन मिसळून त्यापासून हँण्ड सॅनिटायझर तयार करताना आढळून आला. कुठलेही तांत्रिक ज्ञान नसताना व हँड सॅनिटायझर बनविण्याच्या परवान्याशिवाय हा उद्योग चालू होता.
त्याच्याकडून सॅनिटायझर बनविण्यासाठी लागणारे साहीत्य असा एकुण 2 लाख 18 हजार 366 रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले आहे. त्याकडे सदरचे हँण्ड सॅनिटायझर बनविण्याचा अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना नसल्याने सॅनिटायझर व साहित्य जप्त करुन औषध निरिक्षक अशोक तुकाराम राठोड, अन्न व औषध प्रशासन विभाग, अहमदनगर यांच्या फिर्यादीवरुन फसवणूक व अन्न, औषध कायद्यानुसार श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामराव ढिकले, औषध निरिक्षक अशोक तुकाराम राठोड, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, पोलीस हवालदार संभाजी शिंदे, प्रकाश मांडगे, दादा टाके, किरण बोराडे, गोकुळ इंगवले, संतोष कोपनर, शरद चोभे, लता पुराणे यांच्या पथकाने केली आहे.
dbyZCwGMQIAnPap