राजेंद्र मस्के । जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींमुळेच कुकडीच्या पाण्याचा घोळ
श्रीगोंदा ग्रामीण । वीरभूमी - 13-May, 2021, 12:00 AM
कुकडीच्या पाण्याविषयी वृत्तपत्रे व समाजमाध्यमांवर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी कुकटी आवर्तनाचा पेच सुटला अशा प्रतिक्रिया देऊन नेतेमंडळी शेतकर्यांच्या डोळ्यात धूळ फेकत आहेत. लागली ठेच सुटला पेच मात्र शेतकर्यांच्या तोंडाला आला फेस. पेच सुटला तर मग पाणी का सुटले नाही?
असा उद्विग्न प्रश्न विचारत आतातरी राजकारणाची नौटंकी थांबवा, उन्हाळी आवर्तन जून महिन्यात सोडणार आहात का? या उष्णतेने नगर जिल्हा जळून खाक झाल्यानंतर पाणी सोडणार आहात काय? असा प्रश्न पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी विचारला आहे.
याबाबत ‘वीरभूमी’शी बोलताना मस्के म्हणाले की, न्यायालयीन प्रक्रियेमुळे वारंवार पाणी सोडण्यास स्थगिती मिळत असल्याने शेतकर्याला आवर्तन जून महिन्यात मिळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याला जबाबदार कोण? लोकप्रतिनिधी बैठका घेऊन याचिका माघारी घेत आहेत, असे सांगत आहेत. मग इतक्या दिवस झोपा काढत होता की काय? कोर्टात गेलेले प्रशांत औटी हे शेतकरी आहेत की कर्मचारी आहेत. का कोणत्या पार्टीचा कार्यकर्ते आहेत, याचाही विचार करण्याची सध्या गरज आहे. मात्र सध्या जाणून बुजून वेळकाढूपणा सुरू आहे.
दि. 20 एप्रिल रोजी आवर्तन सुटायला पाहिजे होते ते आज जून महिना जवळ आला तरीसुद्धा सुटले नाही. अजूनही पाण्याबाबत कोणतीच श्वास्वती शेतकर्याला वाटत नाही. आपण सगळे या सल्लागार समितीचे सदस्य आहेत. त्या जलसंपदा विभागाअंतर्गत येणार्या सर्व गोष्टीची माहिती घेऊन पाठपुरावा करायला पाहिजे होता.आपण फक्त सल्लागार समितीच्या बैठकीची वाट पाहत बसले. त्या अगोदर कोणत्या धरणात किती पाणी आहे, ते एकत्र करण्यासाठी काय करावे लागेल, त्याला किती कालावधी लागणार आहे, त्याची तयारी दोन महिन्यापूर्वी केली असती तर आज डिंबे धरणामधील उपयुक्त साठा 6 टीएमसी पाणी असताना आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या आवर्तनाची वाट बघण्याची आवश्यकता राहीली नसती. आणि खरा खेळ तिथून सुरू झाला आणि आज तो कोर्टात जाऊन अटकला आहे. हा खेळ किती दिवस चालवायचा आहे. तुमच्या सगळ्याच राजकारण होतंय पण शेतकरी मात्र यामध्ये पूर्णपणे होरपळून निघाला आहे.
कोणाच्या सांगण्यावरून कोर्टात गेला होता याचा विचार करण्याची वेळ आता आली आहे. कालचे लोकप्रतिनिधींची मंत्र्याच्या दालनात बैठक म्हणजे वराती मागून घोडं अशी आहे. आज तालुका उभा जळतोय आणि निर्णय झालाय, असं सांगताय, मग का पाणी सुटले नाही. आता कोणाची वाट बघत आहेत, नगर जिल्हा जळून खाक व्हायची की काय. तुमच्या राजकारणापायी मेला आमचा शेतकरी. आता तरी तुमचे हे नाटक थांबवा.
ही परिस्थिती सल्लागार समिती आणि अधिकारी यांच्यामुळे निर्माण झाली. आणि परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने मार्ग काढायला निघालेला आहे, असे सांगत ते म्हणाले, एवढीच काळजी तुम्हाला जनतेची होती तर गेली दोन महिने तुम्ही काय करत होतात? असा संतप्त सवाल पाटपाणी कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी व्यक्त केला आहे.
Comments