कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना मनस्ताप
कर्जत । डॉ. अफरोजखान पठाण- 19-May, 2021, 12:00 AM
कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृत्यू दाखला मिळवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांना कर्जत नगरपंचायतीमध्ये हेलपाटे मारावे लागत आहेत. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर पालिकेचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी विहित नमुन्यातील फॉर्म उपलब्ध नसल्याने मृत्यू दाखला देण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. मात्र त्या अडचणी दूर करून मृत्यू दाखले दिले जातील, असे आश्वासन दिले.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना मागील महिन्यात अनेक कोरोना बाधीतांचे उपचारादरम्यान निधन झाले होते. त्या व्यक्तीवर कर्जत नगरपंचायतीच्या वतीने सर्व सोपस्कार पूर्ण करत अंत्यविधी आणि दफनविधीही करण्यात आले. यासह यासर्व मृतांची नोंद कर्जत नगरपंचायत करत असल्याने त्यांचे मृत्यूचे दाखले देण्याची जबाबदारी नगरपंचायतीकडेच देण्यात आली आहे.
त्यासाठी मात्र त्यांना त्यावर उपचार करणार्या वैद्यकीय अधिकार्यांची स्वाक्षरी आवश्यक असते. मात्र मागील अनेक दिवसांपासून कोरोना झालेले वैद्यकीय अधिकारी कर्तव्यावर हजर झाले नाहीत. यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांचे मृत्यूचे दाखले प्रलंबित आहेत.
तर दुसरीकडे दररोज मयताचे नातेवाईक मृत्यू दाखला मिळण्यासाठी कर्जत नगरपंचायतीचे उंबरे झिजवत आहेत. मात्र नियमापुढे मुख्याधिकारी देखील हतबल होत असल्याने अनेक नातेवाईकांनी शेवटी आमच्या प्रतिनिधीकडे धाव घेत वरील हकीगत कथन केली.
यानंतर मुख्याधिकारी यांच्याशी संपर्क केला असता यावर लवकरच आपण तोडगा काढून अनेकांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करत लवकरच मृत्यूचे दाखले मिळतील, असे आश्वासन मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी दिले आहे.
तर्राबाबत तहसीलदार नानासाहेब आगळे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर त्यांचे मृत दाखले कर्जत नगरपंचायत तात्काळ उपलब्ध करेन. याबाबत आपण वैद्यकीय आधिकार्यांशी बोललो आहोत. त्यांच्या उपचार कागदपत्र आधारे कोरोना मृत दाखले देण्यात येतील, असे निर्देश संबंधिताना दिले असल्याचे सांगितले.
Comments