बाप जखमी । आरोपी मुलगा पोलिसांच्या ताब्यात
अहमदनगर । वीरभूमी- 20-May, 2021, 12:00 AM
सैन्यातून निवृत्त झालेला बाप नेहमीच दारु पिऊन आईला मारहाण करतो, या कारणावरून पोटच्या मुलानेच बापावर गोळी झाडून जखमी केले. ही घटना आज गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान आष्टी शहरातील विनायकनगर येथे घडली.
या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमीचे नाव संतोष किसन लटपटे (वय 50) असे असून आरोपी मुलाचे नाव किरण संतोष लटपटे (वय 24) असे आहे. आरोपी हा पुणे येथे सिक्युरिटी ऑफीसमध्ये कामाला असून तो नुकताच सुट्टीला आल्याची माहिती समजली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, आष्टी शहरातील विनायकनगर भागात राहणारे संतोष लटपटे हे तीन महिण्यापूर्वी सैन्य दलातून निवृत्त झाले आहेत. सैन्यातून निवृत्त झाल्यापासून संतोष लटपटे हे नेहमी दारु पिऊन पत्नीला नेहमी मारहाण करत त्रास देत असत. त्यातच पुणे येथे सिक्युरिटी ऑफीसमध्ये नोकरीला असलेला मुलगा मागी आठवड्यात सुट्टीवर आला आहे. मुलगा सुट्टीवर आला असतांनाही वडील नेहमीप्रमाणे दारू पिऊन आईला त्रास देत असल्याने आज गुरुवारी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याच्या समोरही नेहमीप्रमाणे आई-वडीलांमध्ये वाद झाला.
असेच नेहमीप्रमाणे आजही पत्नी व मुलासोबत भांडण सुरू झाल्यानंतर संतोष लटपटे यांनी कपाटातील बंदुक काढून ‘माझ्याकडे लायन्स असलेली बंदूक आहे. मी सांगत नसतो तर थेट गोळ्या घालत असतो’ असे म्हणुन मुलावर व पत्नीवर बंदूक रोखली. मात्र संतोष लटपटे हे नशेत असल्याने त्यांच्या हातातील बंदूक खाली पडली. त्याचवेळी मुलगा किरण याने घाईने खाली पडलेली बंदूक उचलून रागाच्या भरात वडील संतोष लटपटे यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या.
यातील एक गोळी संतोष लटपटे यांच्या पोटाला लागली तर एक गोळी चुकली. गोळी लागल्याने संतोष लटपटे हे जखमी होऊन खाली पडले. जखमी अवस्थेत असलेल्या वडीलांना सुरुवातीला आष्टी येथील ग्रामील रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना बीड येथे पुढील उपचारासाठी दाखल केले.
या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी मुलाग किरण लटपटे याला ताब्यात घेतले. त्याचा जबाब घेतला असता वडील दारुच्या नशेत आईला नेहमीच त्रास देत असल्याने रागाच्या भरात आपल्याकडून वडीलांवर चुकून गोळी झाडल्याचे म्हटले आहे.
या दरम्यान आरोपी मुलगा यानेही दारू पिली असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सलीम चाऊस हे करीत आहेत. तर जखमी संतोष लटपटे यांची प्रकृत्ती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले.
Comments