जिल्ह्यातील या पाच कारखान्यांचा ऊस गाळपात राज्यात उच्चांक
अहमदनगर । वीरभूमी- 28-May, 2021, 12:00 AM
यावर्षीच्या गाळप हंगामात राज्यातील 190 सहकारी व खाजगी साखर कारखान्यांनी तब्बल 1012 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 106.3 लाख मेट्रिक टन साखर उत्पादित केली आहे. या हंगामात सर्वाधिक गाळप केलेल्या पहिल्या 10 कारखान्याच्या यादीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील तब्बल 5 कारखान्याने स्थान मिळवले आहे. तसेच सर्वाधिक साखर उत्पादित केलेल्या कारखान्यांच्या यादीत दोन कारखान्यांनी स्थान मिळवले आहे.
सर्वाधिक ऊस गाळप करणार्या कारखान्यांच्या पहिल्या दहा मध्ये नगर जिल्ह्यातील श्री अंबालिका कारखान्याने 16 लाख 8 हजार मेट्रिक टन उसाचे गाळप करून राज्यात दुसरा क्रमांक पटकाविला आहे. तर भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याने 14 लाख 50 हजार मेट्रिक टन गाळप करून राज्यात चौथा क्रमांक मिळवला आहे.
तसेच जिल्ह्यातील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याने 13 लाख 3 हजार मेट्रिक टन गाळप करून राज्यात सहावा क्रमांक मिळवला. तर सोनई येथील मुळा कारखान्याने 12 लाख 58 हजार मेट्रिक टन गाळप करून नववा तर शेवगाव तालुक्यातील गंगामाई साखर कारखान्याने 12 लाख 55 हजार मेट्रिक टन गाळप करून 10 वा क्रमांक मिळवला आहे.
त्याप्रमाणे राज्यात सर्वाधिक साखर उत्पादित करण्यात आलेल्या पहिल्या 10 साखर कारखान्यांमध्ये श्री अंबालिका शुगर्सने 17 लाख 15 हजार मेट्रिक टन साखर उत्पादित करून राज्यात दुसरा तर भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याने 15 लाख 60 हजार 300 मेट्रिक टन गाळप करून राज्यात चौथा क्रमांक पटकावला आहे.
त्याप्रमाणे सर्वात कमी साखर उतारा मिळवणार्या पहिल्या दहांमध्ये जिल्ह्यातील दोन कारखान्याचा क्रमांक लागतो आहे. यामध्ये वाळकी येथील पियुष शुगर्स साखर कारखान्याने 7.55 टक्के साखर उतारा मिळवत राज्यात चौथा तर प्रवरानगर येथील पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याचा 7.79 टक्के साखर उतारा मिळवत राज्यात पाचवा क्रमांकावर राहिला आहे.
ऊस उत्पादकांना एफआरपी पेक्षा जास्त ऊसदर देणार्या कारखान्याच्या यादीमध्ये नगर जिल्ह्यातील श्री अंबालिका शुगर्सने दुसरा क्रमांक मिळवला आहे. मात्र उस उत्पादकांना सर्वाधिक प्रति टन दर देणार्या कारखान्याच्या यादीमध्ये एकाही कारखान्याला पहिल्या दहामध्ये स्थान मिळवता आले नाही.
ऊस उत्पादक शेतकर्यांना राज्यात सर्वाधिक प्रति टन ऊसदर देणार्या कारखान्यामध्ये सांगली जिल्ह्यातील वांगी (ता. कडेगाव) येथील सोनहिरा सहकारी साखर कारखान्याने प्रथम क्रमांक मिळवला असून या कारखान्याने दिलेला ऊसदर हा 3176 रुपये प्रति टन एवढा आहे.
एकंदरीत यावर्षीचा गाळप हंगाम राज्यातील खाजगी 95 व सहकारी 95 अशा 190 साखर कारखान्यांनी सरासरी 140 दिवसाचा गाळप हंगाम पूर्ण करून गाळप हंगाम यशस्वी केला आहे.
Comments