अहमदनगर जिल्ह्यासाठी अशी असेल लॉकडाऊन नियमावली
अहमदनगर जिल्ह्यासाठी अशी असेल लॉकडाऊन नियमावली
अहमदनगर । वीरभूमी- 31-May, 2021, 12:00 AM
अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर हा 20 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याने जिल्ह्यातील लॉकडाऊन 15 जून पर्यंत वाढविण्यात आला आहे. या काळात दि. 12 मे 2021 च्या ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध कायम राहणार आहेत. या नियमाचे पालन न केल्यास कारवाई होईल, यामुळे नागरिकांना 12 मे रोजीचे नियम पाळावे लागणार आहेत.रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाजमाध्यमाशी संवाद साधत कोरोना अजून संपलेला नाही, नियम पाळावेच लागतील असे सांगत 15 जून पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचे सांगितले. हे सांगतांना काही ठिकाणचे निर्बंध शिथील करण्याचे सांगितले होते. त्या आदेशाप्रमाणे राज्यातील रुग्णांच्या पॉझिटिव्हीटी टक्केवारीनुसार दोन प्रकार करण्यात आले आहेत.
अहमदनगर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर हा 20 टक्क्यांपेक्षा जास्त असून एकूण उपलब्ध असलेले ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरलेले आहेत. यामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात 12 मे 2021 रोजीचे ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
यामुळे अहमदनगर जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद राहणार असून कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत किंवा बाहेर जाण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणार्या व्यक्तींना हा नियम लागून राहणार नाही.
दि. 12 मे 2021 रोजीच्या ब्रेक दि चेन नियमावली प्रमाणे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवांना सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्याची परवानगी कायम ठेवण्यात आली आहे. इतर सेवा व दुकानांना निर्बंध कायम राहणार आहेत. तसेच अत्यावश्यक दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध असणार नाहीत. मात्र दुकानांना ठरलेल्या वेळेतच विक्री करता येणार आहे. या नियमांचा दुकानदाराने भंग केल्यास सदरील दुकान कोरोना संसर्ग संपत नाही तो पर्यंत सील करण्यात येईल.
कोणत्याही वाहनातून जिल्ह्यामध्ये दाखल होणार्या प्रत्येक व्यक्तीकडे आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणार्या संवेदनशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणार्या व्यक्तींसाठी लागू राहणार आहेत.
स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. नियमाचे पालन होत नाही असे आढळल्यास त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद करण्याचा किंवा निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेऊ शकतात.
अत्यावश्यक सेवांसह दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि विक्री साठी कोणतेही निर्बंध असणार नाहीत. मात्र यावेळी शासनाने ठरवून दिलेली नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. सकाळी 7 ते 11 या वेळेत अत्यावश्यक सेवा देणार्या दुकानदारांना दूध विक्री करता येईल किंवा घरपोहोच सेवा देता येईल.
या व्यतिरिक्त कोरोना परिस्थिती पाहुन स्थानिक डीएमए आपल्या अधिकारीत भागांमध्ये निर्बंध आणखी कडक करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु हे निर्बंध लावण्याच्या अगोदर याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला द्यावी लागेल. तसेच हे निर्बंध लागू करण्याच्या 48 तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागणार आहे.
Tags :
Comments