जिल्ह्यातील ठोक किराणा, भुसार दुकानांसाठी नवी नियमावली
अहमदनगर । वीरभूमी - 01-Jun, 2021, 12:00 AM
जिल्ह्यातील लॉकडाऊन दि. 15 जून पर्यंत वाढवण्यात आला मात्र नगर शहरातील जनता कर्फ्यूमुळे ठोक किराणा व भुसार मालाची दुकाने बंद होती. मात्र ही दुकाने सुरू करण्याबाबत जिल्हा प्रशासन व महानगर पालिका प्रशासन यांच्यात चर्चा होऊन शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, आडते बाजार, दाळ मंडई येथील जीवनावश्यक वस्तू व अन्न धान्य व्यापार सुरू करण्याबाबत सांगोपांग चर्चा करण्यात आली.
या चर्चा दरम्यान अत्यावश्यक सेवांतर्गत येत असणार्या किराणा दुकानांमध्ये मालाचा पुरवठा सुरळीतपणे होणेकामी विक्रीच्या किराणा दुकानांसह ठोक विक्रेत्यांना परवानगी देण्याबाबत सर्व सदस्यांचे एकमत झाले. यानुसार जिल्ह्यातील ठोक किराणा, भुसार दुकानांसाठी नियमावली जाहीर करून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील ठोक किराणा, भुसार दुकाने सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवार सकाळी 11 ते सोमवार सकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य यार्डात फक्त भुसार मालाचे व्यवहारास सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर मुख्य यार्डात फळे व भाजीपाला यांचे व्यवहारास प्रतिबंध करण्यात आला असून फळेल भाजीपाला, कांदा यांचे व्यवहार सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत नेप्ती उपबाजार येथे परवानगी देण्यात आली आहे.
तसेच संगमनेर बाजार समितीच्या मुख्य यार्डात भुसार व कांदा या शेतमालाचे व्यवहारासपरवानगी देण्यात आली असून उपबाजार वडगाव पान येथे फळे व भाजीपाला यांच्या व्यवहारास परवानगी देण्यात आली असून हे व्यवहार सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहणार आहेत. तर शनिवार सकाळी 11 ते सोमवार सकाळी 7 या वेळेत बंद राहणार आहेत.
त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्ह्यातील इतर बाजार समित्या व उपबाजार येथे सोमवार ते शनिवार सकाळी 7 ते 11 या वेळेत सर्व शेतमालांचे व्यवहार करण्यास परवानगी देण्यात आली असून शनिवार सकाळी 11 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत हे व्यवहार बंद राहणार आहेत.
तरी या नियमाचे उल्लंघन केल्यास कोरोना काळात संबधित दुकान सील करण्याचा इशारा देण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेत माल विक्रीसाठी परवानगी मिळाल्याने शेतकरी व व्यापारी यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे.
Comments