पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती । करंजी येथील डॉक्टर आत्महत्या प्रकरण
अहमदनगर । वीरभूमी - 08-Jul, 2021, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात डॉ. गणेश शेळके यांनी वरीष्ठांच्या जाचाला कंटाळून केलेल्या आत्महत्येपुर्वी चिठ्ठी लिहुन ठेवली होती. या चिठ्ठीमध्ये आरोग्य अधिकारी भगवादन दराडे यांच्यासह तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचा उल्लेख आहे. या आत्महत्याप्रकरणी पाथर्डी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन कारवाई करण्यात येईल अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रात लसीकरण सुरू असतांनाच समुदाय अधिकारी डॉ. गणेश गवर्धन शेळके यांनी मंगळवारी दुपारी 1 वाजेच्या दरम्यान आपल्या दालनात छताच्या पंख्याच्या हुकाला गळफास घेत आत्महत्या केली होती. आत्महत्या करण्यापूर्वी डॉ. शेळके यांनी एक चिठ्ठी लिहुन ठेवली होती. त्या चिठ्ठीत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांच्या नावासह प्रशासनातील तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचा उल्लेख आहे. आत्महत्या वरीष्ठांच्या जाचाला कंटाळून करत असल्याचे स्पष्ट लिहिले आहे.
दरम्यान पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज जिल्हा दौर्यावर आले असतांना त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशीचे आदेश देत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच याबाबत चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल, असे पालकमंत्री यांनी सांगितले.
डॉ. गणेश शेळके यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात आणला होता. मात्र तेथे उत्तरीय तपासणी न करता अगोदर नगर व नंतर औरंगाबाद येथे पाठविण्यात आला. डॉ. शेळके यांच्या पार्थीवावर बुधवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान औरंगाबाद येथे उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी नेवासा तालुक्यातील बहिरवाडी या त्यांच्या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान बुधवारी रात्री उशिरापर्यंत पाथर्डी पोलिस ठाण्यात डॉ. गणेश शेळके यांच्या आत्महत्याप्रकरणी आक्समित मृत्यू म्हणुन नोंद होती.
तहसीलदार मंगळवार सायंकाळपासूनच नॉट रिचेबल
डॉ. गणेश शेळके यांनी आत्महत्यापुर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्ीमध्ये आरोग्य अधिकारी डॉ. भगवान दराडे यांच्यासह तहसीलदार व जिल्हाधिकारी यांचा उल्लेख आहे. या घटनेमुळे पाथर्डीचे तहसीलदार मंगळवारी सायंकाळपासूनच नॉटरिचेबल झाले आहेत. तसेच खा. सुजय विखे यांच्या राष्ट्रीय महामार्गासंबधी आयोजित बैठकीलाही तहसीलदार गैरहजर होते.
zibtXJCHGwuB