विनापरवाना रस्ता खोदल्याने हॉटेल मालकावर गुन्हा दाखल
अहमदनगर । वीरभूमी- 09-Jul, 2021, 12:00 AM
शहरातील अंतर्गत रस्त्यांवर विनापरवाना खोदकाम केल्याप्रकरणी एका हॉटेल मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिकेचे अभियंता श्रीकांत निंबाळकर यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली.
निंबाळकर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, 21 जून 2021 रोजी ठेकेदार चंद्रशेखर मस्के यांनी मला फोन करून कळवले की, प्रभाग क्रमांक 13 मधील नगर-पुणे रस्त्यावरील हॉटेल पंचवटीच्या मागील गणेशवाडीकडे जाणार्या रोडवर हॉटेल रेडियसजवळ असणारा डांबरी रोड खोदलेला आहे.
त्यानुसार संबंधित रस्त्याची पाहणी केली असता तो खोदलेला आढळून आला. याबाबत हॉटेलचे मालक राहुल रासकोंडा यांना विचारणा केली. त्यावर त्यांनी टेलिफोन केबलच्या वायर दुरुस्तीसाठी आम्हीच रस्ता खोदला असल्याचे सांगितले.
याप्रकरणी पंचनामा करून आयुक्तांसमोर अहवाल सादर करण्यात आला. त्यानंतर विनापरवाना रस्ता खोदल्याप्रकरणी संबंधित हॉटेल मालकांना नोटीस बजावण्यात आली. परंतु त्यांनी कोणताही दंड न भरल्याने त्यांच्या विरोधात फिर्याद दाखल करण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले.
त्यानुसार संबंधित हॉटेल मालकाच्या विरोधात फिर्याद देत असल्याचे निंबाळकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. निंबाळकर यांच्या फिर्यादीनुसार हॉटेल मालकांच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
RrtqPjkX