लाखाला दररोज हजाराचे व्याज । कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
कर्जत । वीरभूमी- 09-Jul, 2021, 12:00 AM
कर्जत तालुक्यात खाजगी सावकारकीचा धंदा तेजीत आला असून व्याजाने दिलेल्या एक लाख रुपये मुद्दल रकमेवर दर दिवसाला एक हजार रुपये व्याज घेणार्या सावकारावर कर्जत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कर्जत पोलिसांच्या खाजगी सावकाराविरुद्ध मोहिमेला नागरिक उत्तम प्रतिसाद देत असून आणखी मोठे मासे गळाला लागण्याची दाट शक्यता आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी लागलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने तसेच ट्रॅव्हलिंगच्या गाड्या बंद झाल्याने तक्रारदार यांनी गाडीचे हप्ते भरण्यासाठी एजाज उर्फ भोप्या सय्यद याच्याकडुन ऑक्टोबर 2020 रोजी व्याजाने 2 लाख रुपये घेतले होते. त्या रकमेचा व्याजाचा दर एक लाख रुपयाला प्रतिदिन 1 हजार रुपये असा ठरला होता. मात्र लॉकडाऊन असल्याने ट्रॅव्हलिंगचा व्यवसाय व्यवस्थित चालत नसल्याने फिर्यादी यांनी सय्यद याच्याकडून टप्प्याटप्प्याने दिड लाख रुपये घेतले.
फिर्यादीने घेतलेल्या रक्कमेला दररोज एक हजार रुपये व्याज द्यावे लागत होते. त्यानंतर आरोपीने व्याजाला चक्रवाढ रक्कम लावल्याने मुद्लेची रक्कम ही 6 लाख रुपयांवर गेली. फिर्यादीने व्याजापोटी खाजगी सावकार सय्यद याला 3 लाख रुपये दिले. 3 लाखांची रक्कम देऊनही 9 लाख रुपये आणखी द्यावे लागतील, असे आरोपीने सांगितले.
आरोपी सावकार सय्यद हा व्याजाने दिलेले पैसे वसुल करण्यासाठी गाडी अडवून फिर्यादीला दमदाटी व शिवीगाळ करत होता. खाजगी सावकार सय्यद याने फिर्यादीच्या स्विफ्ट कारची नोटरी करून त्याच्याकडून 2 कोरे धनादेशही घेतले. फिर्यादीने ‘माझी सध्या पैसे देण्याची परीस्थिती नाही. माझे व्याज माफ करा. मी तुम्हाला मुद्दल टप्प्याटप्प्याने देतो’ अशी विनंती सावकाराकडे केली होती. मात्र सावकार सय्यद याने फिर्यादीचे काही ऐकले नाही.
आरोपी सय्यदच्या त्रासामुळे फिर्यादीची मानसिक स्थिती खराब झाली होती. त्यामुळे खाजगी सावकाराच्या नेहमीच्या वसुली जाचाला कंटाळून कर्जत पोलिस ठाण्यात गु. र. नं. 328/2021 भा.दं.वि. कलम 341, 504, 506 तसेच महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 चे कलम 39 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार भाऊसाहेब यमगर, सचिन वारे यांनी सदर कारवाई पार पाडली असुन पुढील अधिक तपास पोलीस अंमलदार महादेव गाडे हे करत आहेत.
ZkyfenXTrQxURm