आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा
मुंबई । वीरभूमी- 11-Jul, 2021, 12:00 AM
ज्या भागात कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे तेथे निर्बंध लावावेत. मात्र ज्या भागात कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे तेथील निर्बंध शिथील करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालना येथे बोलतांना दिली. यामुळे मुख्यमंत्री काय निर्णय घेतात याकडे नागरिकांसह व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे. (Health Minister Rajesh Tope said that he had asked Chief Minister Uddhav Thackeray to provide relief to the people by relaxing the restrictions in areas where corona infection is under control.)
राज्याच्या पश्चिम भागात कोरोना संसर्गाचा उद्रेक कायम असला तरी इतर भागात कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. तरीही कोरोनाचे निर्बंध शिथील न झाल्याने नागरिक व व्यावसायिक त्रस्त झालेले आहेत. यामुळे हे निर्बंध काढून टाकावे नाहीतर पुर्णपणे कडक लॉकडाऊन करावा, अशी विनंती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मागील काही दिवसापासून राज्यातील कोरोनाची लाट नियंत्रणात असल्याचे ग्राह्य धरून राज्य सरकारने ज्या जिल्ह्यात कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे तेथे निर्बंध शिथील करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर मात्र फक्त तीनच आठवड्यात सरकारने अचानक संपुर्ण राज्यात स्तर तीनची नियमावली जाहीर केल्याने सुरु होत असलेले मॉल्स व थिएटर्स पुन्हा एकदा बंद झाले आहेत. तसेच रात्रीपर्यंत सुरू असलेली दुकाने दुपारी 4 नंतर बंद करावी लागत आहेत. यामुळे व्यापारी वर्गात राज्य शासनाविषयी नाराजी पसरली आहे.
ज्या भागात कोरोना संसर्गाची परिस्थिती गंभीर आहे त्या भागात निर्बंध कडक करावेत. मात्र ज्या भागात कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे तेथे निर्बंध शिथील करून उद्योग व्यावसायासाठी पुर्ण परवानगी द्यावी, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर ही मागणी मान्य केली असून ते यावर लवकरच आपला निर्णय जाहीर करतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
तसेच राज्यातील लसीच्या तुटवड्याबाबत विधीमंडळात ठराव करून तो केंद्र सरकारला पाठविला असून लवकरच यावर चर्चा करण्यासाठी नूतन केंद्रीय आरोग्य मंत्री यांची भेट घेणार असल्याचे टोपे यांनी सांगितले.
Comments