पाथर्डीत मुंडे समर्थकांचे राजीनामा सत्र
पाथर्डी । वीरभूमी - 11-Jul, 2021, 12:00 AM
पाथर्डी तालुक्यातील भाजपच्या अनेक पदाधिकार्यांनी पक्षाचे व इतर पदाचे राजीनामे दिले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात खासदार प्रीतमताई मुंडे यांना स्थान न मिळाल्यामुळे तालुक्यातील व जिल्ह्यातील मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड असंतोष व नाराजी आहे. त्यामुळे तालुक्यातील मुंडे समर्थक कार्यकर्त्यांनी राजीनामा सत्र सुरू केले आहे. या राजीनाम्यामुळे तालुक्यातील सत्ताधारी भाजपला चांगलाच धक्का बसणार आहे.
मोदी सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाला यामध्ये अनेक नवीन चेहर्यांना संधी देण्यात आली त्यात प्रामुख्याने इतर पक्षातून आलेल्या नवीन चेहर्यांना संधी देण्यात आली. परंतु संसदीय कामकाजाचा अनुभव असलेल्या प्रीतमताई मुंडे यांना संधी न मिळाल्याने तालुक्यातील पंकजा मुंडे समर्थकांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. या घटनेने नाराज होऊन अनेकांनी आपले राजीनामे भाजप जिल्हाध्यक्ष यांच्याकडे पाठवले आहेत.
काल पंकजा मुंडे यांनी माध्यमांसमोर येवुन नाराज नसल्याचे सांगितल्यानंतरही समर्थकांमध्ये मात्र अस्वस्थता असून प्रदेश भाजप जाणीवपूर्वक पंकजा मुंडे यांचे राजकीय खच्चीकरण करत आहे. प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांना डावलण्यात येऊन बाहेरून आलेल्या व्यक्तींना पक्षामध्ये स्थान दिले जाते. आमदार, खासदार व मंत्री केले जाते. परंतु ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी मोठे प्रयत्न केले व ज्यांच्या मागे जनमत आहे. त्यांना मात्र डावलले जाते अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त करत आपले राजीनामे दिले आहेत.
यामध्ये पाथर्डी पंचायत समितीच्या सभापती सुनिता दौंड, जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी गोकुळ दौंड, जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोल गर्जे, सरचिटणीस सचिन पालवे, रणजीत बेळगे, अर्जुन धायतडक आदी पदाधिकारी यांचा समावेश आहे. तर आज रविवारी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर हे पत्रकार परिषद घेणार आहेत व आपला राजीनामा सादर करणार आहेत.
माजी नगरसेवक रामनाथ बंग व विद्यमान नगरसेविका सौ. दीपाली बंग यांनी पंकजाताई यांच्या समर्थनार्थ नगरसेवक व इतर पदांचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. याव्यतिरिक्त अनेक पदाधिकारी सरपंच, उपसरपंच राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.
vBZDrOJnEkYRT