पंकजा मुंडे यांचा निर्वाणीचा इशारा; राजीनामा प्रकरणाला स्वल्पविराम देण्याचे आवाहन
मुंबई । वीरभूमी- 13-Jul, 2021, 12:00 AM
माझे दुःख पाहुन तुम्ही असा निर्णय घेतला असेल. मात्र मी तुम्हाला दुःखी करून कसे जगू. कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यावर स्वार होणारी मी नाही. इथं राम राहीला नाही, असे वाटेल तेंव्हा काय तो निर्णय घेऊ. आता आपण आपले घर का म्हणुन सोडायचे, असे म्हणात ज्यांनी राजीनामे दिले त्यांनी त्याला आता स्वल्पविराम द्यावा, पूर्ण विराम नाही. असे म्हणत कार्यकर्त्यांचे राजीनामे नामंजूर केले असल्याचे माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करतांना सांगितले.
केंद्रीय मंत्रिमंडळात खा. प्रीतम मुंडे यांना डावलल्याची भावना व्यक्त करत बीड जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी, शेवगाव, नेवासा, जामखेड व इतर ठिकाणच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. या राजीनामा सत्रांवरुन पंकजा मुंडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची दिल्लीत भेट घेतली. त्यानंतर आज मंगळवारी मुंबईत नाराज समर्थकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतांना माजीमंत्री पंकजा मुंडे बोलत होत्या.
पंकजा मुंडे यांची भूमिका ऐकण्यासाठी सकाळ पासूनच वरळी येथील गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठाणच्या कार्यालयाबाहेर समर्थकांनी गर्दी केली होती. यावेळी मार्गदर्शन करतांना पंकजा मुंडे म्हणाल्या, मी दिल्लीत गेले तेंव्हा पक्ष संघटनेवर चर्चा झाली. मी केंद्रीय मंत्री नसले तरी राष्ट्रीय मंत्री आहे. आपली एकीची मुठ ही आपली शक्ती आहे. यामुळे आपली शक्ती कमी करण्याचा डाव कधीही सफल होऊ देणार नाही. निवडणुकीत माझा पराभव झाला पण मी संपलेले नाही. घर फुटल्याचे दुःख भोगले आहे. जोपर्यंत शक्य आहे तो पर्यंत धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. मी वयाने मोठ्या, मानाने मोठ्यांचा कधीच अपमान केला नाही. कोणताही माणुस कोणताही निर्णय घेतो तो लाभार्थी असतो. एक व्यक्ती निर्णय घेऊन काहीही प्राप्त करू शकतो. मात्र मला तुमच्यासाठी निर्णय घ्यायंचा आहे. कष्टाने निर्माण केलेले घर का सोडायचे? छत अंगावर पडेल तेंव्हा पाहु. माझा नेता मोदी, अमित शहा व जे. पी. नड्डा हे आहेत.
मला पक्षाने काय दिले हे मी लक्षात ठेवते. तर मला काय दिले नाही ते कार्यकर्ते लक्षात ठेवतात. माझ्याबरोबर कोणाला काही मिळाले तर मला आनंदच आहे. काही घटना आपल्या मनासारख्या घडल्या नसतील मात्र नाराज व्हायचे नाही. मला ज्या दिवशी वाटेल की आता इथं राम नाही, तेंव्हा काय निर्णय घ्यायंचा ते घेऊ. तेंव्हा तुम्ही माझ्या बरोबर असणार आहात. आता दिलेल्या राजीनाम्याला पुर्ण विराम नाही तर स्वल्पविराम द्यायचा आहे. सर्व कार्यकर्त्यांचे राजीनामे ना मंजूर केल्याची घोषणा पंकजा मुंडे यांनी केली.
कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर पंकजा मुंडे यांनी जिल्हा निहाय कार्यकर्त्यांना स्वतंत्र भेटून चर्चा केली.
Comments