जामखेड तालुक्यातील घटना । सोडवण्यासाठी गेलेले वडील व भाऊ जखमी
जामखेड । वीरभूमी- 17-Jul, 2021, 12:00 AM
घराजवळील खांबावरील तुटून पडलेल्या वीजवाहक तारेचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथे शुक्रवारी पहाटे घडली. तर तरुणाला सोडवण्याचा प्रयत्न करणार्या भाऊ व वडीलही वीजेचा शॉक लागून जखमी झाले.
घटनेतील मयताचे नाव योगेश बळीराम जायभाय (वय 23) असे आहे. या घटनेने जामखेड तालुक्यातून हळहळ व्यक्त होत असून महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील तरुण योगेश बळीराम जायभाय हा पहाटे 6 वाजेच्या दरम्यान झोपेतून उठून नेहमीप्रमाणे शौचालयाला जात होता. दरम्यान घराजवळ असलेल्या वीजवाहक खांबावरील तुटून पडलेली तार त्याला न दिसल्याने त्याचा तारेवर पाय पडल्याने त्याला वीजेचा शॉक लागला. त्याने आरओरडा केल्याने घरातून त्याचे वडील बळीराम जायभाय व भाऊ गोकुळ जायभाय पळत आले. त्यांनी त्याला वीजेच्या तारेपासून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र या दोघांनाही वीजेचा शॉक लागल्याने तेही जखमी झाले.
या घटनेमध्ये वडील बळीराम जायभाय हे बेशुद्ध झाले तर भाऊ गोकुळ जायभाय याचा हात भाजला. दरम्यान शेजारी राहणारे नातेवाईकांनी दोरीच्या साह्याने वीजवाहक तार बाजुला ओढून योगेश याला बाजुला केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला जामखेड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यापुर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.
ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ यांनी मयत योगेशचे शवविच्छेदन करून त्याचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.
शुक्रवारी दुपारी उशीरा वंजारवाडी योगेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
Comments