शेवगाव । वीरभूमी- 22-Jul, 2021, 12:00 AM
मागील वर्षी शेतकर्यांनी भरलेल्या खरीप व रब्बी पिक विम्याची मंजूर झालेली रक्कम शेतकर्यांना अद्याप मिळालेली नाही. पिक विम्याची रक्कम शेतकरी मेल्यावर देणार का? असा संतप्त सवाल जनशक्ती विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते जगन्नाथ गावडे यांनी व्यक्त केला.
सन 2020-21 या वर्षामधील खरीप व रब्बी हंगामामधील मंजूर झालेला पिक विमा शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकर्यांना त्वरित मिळावा, अशा आशयाचे निवेदन अॅड. शिवाजीराव काकडे व सौ.हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जनशक्तीच्या वतीने शेवगाव तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी जगन्नाथ गावडे बोलत होते.
यावेळी नायब तहसीलदार मयूर बेरड यांनी निवेदन स्विकारले. यावेळी जनशक्तीचे उपाध्यक्ष संजय आंधळे, कॉ. राम पोटफोडे, सुरेश चौधरी, किशोर दहिफळे, नवनाथ खेडकर, गोरक्ष चेमटे, शिवाजी लांडे, अजिनाथ कातकडे, विष्णू दिवटे, देवदान अल्हाट, म्हतारदेव आव्हाड, राजेंद्र खेडकर, अनिल नागरगोजे, दिनकर ढाकणे, निष्णू निजवे, तुळशीराम रुईकर, शिवाजी औटी, सुरेश टेकाळे, भाऊसाहेब मासाळ, हरिश्चंद्र आव्हाड, भारत भालेराव, भिवसेन केदार, रघुनाथ घोरपडे, हरिचंद्र निजवे आदी प्रमुख शेतकरी उपस्थित होते.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, सन 2020-21 या वर्षी शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील शेतकर्यांनी खरीप व रब्बी हंगामातील पिकविमा भरला होता. मागील वर्षी अतिरिक्त पावसामुळे दोन्ही हंगामातील पिके वाया गेली होती. यामध्ये कापूस, तूर, मूग, बाजरी, सोयाबीन, गहू, हरभरा आदी हंगामातील पिकांचा समावेश आहे.
सदरची सर्व पिके अतिरिक्त पावसामुळे व वेळेला ताण मिळाल्यामुळे नष्ट झाली होती. या परिस्थितीमुळे शेतकर्यांच्या पदरामधे पेरणीचा खर्च देखील पडला नाही. लाखोंचा खर्च करूनही शेतकर्यांना काहीच न मिळाल्याने शेतकर्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे.
अशा परिस्थितीमध्ये पिकविमा मंजूर करण्यासाठी शासनाने पावलेही उचलली आहेत. आपल्या लगतच्या जिल्ह्यातील शेतकर्यांना पिकविम्याचा लाभही मिळालेला आहे. त्या त्या परिसरातील जागृत लोकप्रतिनिधीमुळे त्यांच्या पदरात ती रक्कम जमा झाली आहे. परंतु या परिसरातील शेतकर्यांचा हा प्रश्न कोणीही न मांडल्याने तो पोरका झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये पिक विमा मिळेल या आशेवर शेतकरी आजही वाट पाहत आहेत.
शेतकर्यांच्या या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर स्वतः लक्ष घालून ही पिक विम्याची रक्कम शेतकर्यांना मिळण्यासाठी तातडीने उचित पावले टाकावीत व दहा दिवसाच्या आत कार्यवाही करून सदरच्या पिकविमा रक्कम शेतकर्याच्या खात्यामध्ये अदा करावी.
अन्यथा दहा दिवसानंतर शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकरी या मागणीच्या पूर्ततेसाठी जनशक्ती विकास आघाडीच्या वतीने अमरापूर ते पाथर्डी उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) पाथर्डी यांच्या कार्यालयावर पायी दिंडी काढून आपला संताप व्यक्त करतील. असेही निवेदनात म्हंटले आहे.
hBbmeXgupDflEr