माजी आ. स्नेहलता कोल्हे यांचा इशारा
कोपरगाव । वीरभूमी - 25-Jul, 2021, 12:00 AM
कोरोना महामारीचा कहर अजूनही संपलेला नाही. अशा परिस्थितीत प्रत्येक जण हवालदिल झालेला आहे. शेतकरी वर्गही त्यातून सुटलेला नाही. थकीत वीज बिले भरणेबाबत प्रत्येकाला अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच पावसाने ओढ दिल्यामुळे खरीप पिके पाण्यावर आहेत. यामुळे थकीत बिलांसाठी वीज वितरण कंपनीने कुठल्याही शेतकर्यांचा वीज पुरवठा खंडित करू नये, अन्यथा त्या विरुद्ध रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागेल, असा इशारा भाजपच्या प्रदेश सचिव माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिला आहे.
याबाबतचे निवेदन ऊर्जा मंत्री नितीन राऊत, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना दिले आहे.
निवेदनात माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी म्हटले आहे की, यंदाच्या खरीप हंगामात पर्जन्यराजा कोपरगाववर काहीसा रूसलेला आहे. जुलै महिना संपत आला तरी पाऊस नाही. परिणामी नागरिकांसह जनावरांसह पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणात अडचण तयार झाली आहे. ज्या शेतकर्यांकडे विहिरीच्या पाण्याचा स्त्रोत आहे, त्यांनी कडवळ, हिरवा चारा पिके घेतली आहेत. काहींनी अल्पशा पावसावर खरीप पिकांची पेरणी केली आहे. ती पिके आता पाण्यावर आली आहेत.
मात्र थकित वीज बिलामुळे महावितरण कंपनीने रोहित्र खंडित करण्याचा सपाटा लावला आहे. परिणामी शेतकर्यांची पंचायत झाली आहे. पाणी असूनही ते पिकांना वेळेवर देता येत नाही. त्याबाबत असंख्य शेतकर्यांनी आपल्याकडे वीज प्रश्नी लक्ष घालून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील या प्रश्नाबरोबरच उर्वरित विजेच्या समस्याबाबत आपण नाशिक येथील मुख्य अभियंता, संगमनेरचे कार्यकारी अभियंता व कोपरगाव उपअभियंता यांच्याशी प्रत्यक्ष बोलणी करून या समस्या त्यांच्या कानी घातल्या आहेत.
यामुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी या प्रश्नात लक्ष घालावे व कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कुठल्याही वीज रोहित्रांचा वीजपुरवठा खंडित करू नये, याबाबत संबंधितांना तात्काळ सूचना कराव्यात, अन्यथा येथील नागरिक व शेतकरी रस्त्यांवर उतरतील, असा इशारा माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी दिला आहे.
Comments