प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी शितल खिंडे यांना पुढील कालखंडासाठी पाथर्डी येथेच नियुक्ती द्या ः प्रा. पाखरे
पाथर्डी । वीरभूमी - 29-Jul, 2021, 12:00 AM
पाथर्डी पंचायत समितीच्या प्रशिक्षनार्थी गटविकास अधिकारी शितल खिंडे यांचा प्रशिक्षण कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा याच ठिकाणी पुढील कालखंडासाठी नियुक्ती देण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रा. सुनील पाखरे यांनी ग्रामविकास मंत्रालयाच्या सचिवांकडे केली आहे. याबाबत प्रा. पाखरे यांनी पत्रव्यवहार केला असून त्यामध्ये शितल खिंडे यांच्या चांगल्या कामाचा उल्लेख केला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात प्रा. पाखरे यांनी म्हटले आहे की, पाथर्डी पंचायत समिती येथे जानेवारी 2021 पासून प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी म्हणून शितल खिंडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या प्रशिक्षणाचा कालावधी थोड्याच दिवसात संपत आहे. त्या प्रशिक्षणार्थी काम करत असताना त्यांनी पंचायत समिती प्रशासनाचा कारभार गतिमान, लोकाभिमुख व पारदर्शक केलेला आहे.
गटविकास अधिकारी म्हणून शितल खिंडे यांनी काम करतांना त्यांनी पाथर्डी पंचायत समिती अंतर्गत असणार्या सर्व विभागाच्या कामाला विशेष प्राधान्य देत अनेक प्रलंबित प्रस्ताव मार्गी लावले आहेत. विविध विभागाच्या लोकहितवादी योजना सर्वांसाठी खुल्या केल्या व त्याचा लाभ हजारो नागरिकांना झाला आहे. तसेच कोरोना काळात आरोग्य, ग्रामविकास व शिक्षण विभागाच्या माध्यमातून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
त्यांनी लोकसहभागातून मार्गदर्शन करत कोविड सेंटर उभारण्यासाठी विशेष पुढाकार घेतला. यामुळे दुर्गम व डोंगरी, ऊसतोडणी कामगार असलेल्या या तालुक्याला या संकटापासून व जीवनमान देण्याचे काम केले आहे. शितल खिंडे या कर्तव्यदक्ष सक्षम व सर्वस्तराचे ज्ञान असणार्या प्रशिक्षणार्थी अधिकारी आहेत. यामुळे सर्वसामान्यांमधून प्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला असून वेळेवर अडवणूक न करता काम झाल्याने समाधानाचे वातावरण आहे.
मात्र प्रशिक्षणार्थी गटविकास अधिकारी शितल खिंडे यांचा कालावधी पूर्ण होत आला आहे. मात्र त्यांनी तालुक्यात केलेले भरीव काम व प्रशासनाची उंचावलेली प्रतिमा यामुळे सर्वसामान्यांमध्ये समाधान आहे. यामुळे पंचायत समितीची येणार्या कालखंडात दिशा ठेवून काम करणार्या व लोकांच्या समस्या सोडविणार्या प्रशासकीय सहकार्यावर नियंत्रण ठेवणार्या गटविकास अधिकार्यांची गरज आहे.
यामुळे पाथर्डी पंचायत समितीच्या प्रशिक्षणार्थी शितल खिंडे यांचा कार्यकाळ पुर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा पाथर्डी पंचायत समितीत पुढील कालखंडासाठी नियुक्ती द्यावी, अशी मागणी प्रा. सुनील पाखरे यांनी ग्रामविकास विभागाकडे करण्यात आली आहे.
Comments