कर्जत । वीरभूमी- 31-Jul, 2021, 12:00 AM
कोविड सुसंगत वर्तवणुकीचे पालन होत नसल्याच्या अनुषंगाने प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांनी रस्त्यावर उतरत दुपारी चारनंतर कर्जत शहर आणि तालुक्यात सुरू असलेल्या 12 दुकानावर कारवाई करीत पुढील आदेश होईपर्यंत सील करण्यात आले आहे.
यामध्ये कर्जत शहरातील जगदंबा कलेक्शन, हॉटेल फिरोज, निलायम मेन्स पार्लर. राशीनमधील दीपक मेन्स पार्लर, दत्त कुशन, संतोष केशभूषा, आशीर्वाद कापड दुकान, प्रिया जनरल स्टोअर्स. माहीजळगाव येथील जाधव किराणा, हॉटेल साइसेवा, पांडुरंग बेकर्स व मिरजगाव येथील सुविधा बेकर्स अशा 12 दुकांनाचा समावेश आहे.
कर्जत शहर आणि तालुक्यातील सर्व आस्थापना सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत या वेळेत सुरू असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिले आहेत. मात्र अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे जिल्हा प्रशासन आणि तालुका प्रशासनाच्या निदर्शनास आले असता शुक्रवार, दि. 30 रोजी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी 3 पथके तयार करीत वरील नियमांचे उल्लंघन करणारे आस्थापना यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले.
यावेळी सदर पथकास कर्जत शहर आणि तालुक्यातील राशीन, मिरजगाव, माहीजळगाव 12 आस्थापना दुपारी चारनंतर खुली तसेच जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशानुसार कोविड सुसंगत वर्तवणुकीचे पालन करीत नसल्याचे आढळले. यावेळी तिन्ही पथकाने त्यावर कारवाई करीत त्यांना पुढील आदेश होईपर्यंत सील करण्यात येत असल्याचे स्पष्ट बजावले आहे.
या पथकात स्वतः प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार नानासाहेब आगळे, सहायक गटविकास अधिकारी रूपचंद जगताप, मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्यासह महसुल, पोलीस कर्मचारी, नगरपंचायत विभाग, ग्रामसेवक सहभागी झाले होते.
यावेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांनी शासनाने आणि जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी दिलेले कोरोना विषयक नियम पुरेपूर पाळत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. यासह कर्जत शहर आणि तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी असणार्या मंगल कार्यालयात होणारे विविध लग्न समारंभ व इतर कार्यक्रमाकरिता पोलीस विभागाची परवानगी आवश्यक आहे.
तसेच या समारंभप्रसंगी कोव्हीड सुसंगत वर्तवणुकीचे पालन होत नसल्यास त्यावर कडक कारवाई करण्यात येईल. विनापरवानगी लग्नसमारंभ व इतर कार्यक्रम घेतल्यास संबंधित मंगल कार्यालय यांच्यावर दंडात्मक तसेच सीलबंद करण्याची कारवाई प्रशासन पार पडेल याची नोंद घ्यावी असे प्रसिद्धपत्रक जाहीर केले आहे.
Comments