मोक्कातील फरार असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळल्या
श्रीगोंदा ग्रामीण । वीरभूमी- 31-Jul, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा, शिरूर, दौंड व सासवड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांखाली मोक्का अंतर्गत कारवाई झालेला सराईत गुन्हेगार लल्या हरदास भोसले याला शोध मोहिमेत पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने शनिवार दि. 30 रोजी कुळधरण (ता. कर्जत) येथे जेरबंद करून अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्रीगोंदा तालुक्यातील राहिंजवाडी (काष्टी) येथील नाजुका माळशिखर्या भोसले या महिलेने लल्या हरदास भोसले (वय 35 वर्षे, रा. गणेगाव, ता. शिरूर, जि. पुणे) याच्या व साथीदारांविरोधात फिर्याद दाखल केली होती.
पोलीस तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त खबर्यामार्फत माहिती मिळाली की, लल्या भोसले हा कर्जत तालुक्यातील कुळधरण येथे आला आहे. या माहितीची खातरजमा करून पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांचे पथक पाठवून आरोपीची शोधमोहीम सुरू असताना तो कुळधरण शिवारात आढळून आला.
त्याला ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. त्याच्याविरुद्ध यापूर्वीही श्रीगोंदा, शिरूर, दौंड व सासवड येथे गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्याचे काही साथीदारही अटकेत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, सहाय्यक फौजदार अंकुश ढवळे, पोलिस नाईक गोकुळ इंगवले, प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादासाहेब टाके यांच्या पथकाने केली आहे.
MzNsQfjAtWXV