पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीला भाजपा पदाधिकार्यांना अडवले
पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी - भाजपातील संघर्ष पेटला
पाथर्डी । वीरभूमी- 14-Aug, 2021, 12:00 AM
पालमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आढावा बैठकीला भाजपा पदाधिकार्यांना रोखल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र तेथे आमदार मोनिका राजळे यांनी येत भाजपा पदाधिकार्यांना प्रवेश मिळवून दिल्यानंतर तणाव निवाळला. या घटनेने आगामी राजकारणात पाथर्डी तालुक्यात राष्ट्रवादी - भाजपा संघर्ष शिगेला पोहण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची आज शनिवारी सुपारी 4 वाजता पाथर्डी शहरातील संस्कार भवन येथे कोरोना आढावा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला प्रशासनकीय अधिकार्यांबरोबरच राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांना प्रवेश देण्यात आला होता.
दरम्यान या आढावा बैठकीला उपस्थित राहण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांच्यासह भाजपाचे पंचायत समिती सभापती सुनीता दौंड, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, सदस्य विष्णुपंत अकोलकर, सुनील परदेशी, पुरुषोत्तम आठरे, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर हे संस्कार भवनच्या गेटवर आले. मात्र गेटवर बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी आमदार मोनिका राजळे यांना प्रवेश देत इतर भाजपा पदाधिकार्यांना प्रवेश नाकारला.
महसूल व पोलीस प्रशासनाने प्रवेश नाकारताच आमदार राजळे संतप्त झाल्या. भाजप पदाधिकार्यांनी घोषणाबाजी सुरू केली. गोंधळ ऐकून प्रमुख अधिकारी प्रवेशद्वारावर आले. आमदार राजळे यांनी त्यांचीही कान उघाडणी केली. लोकप्रतिनिधींना तुम्हीच बोलवता व तुम्हीच अडवता, ते काय अतिरेकी आहेत का, एवढा बंदोबस्त वाढवून बैठकस्थळाला छावणीचे रूप दिले आहे. पक्षीय बैठक आहे की, आढावा बैठक, जे कोणत्याच पदावर नाहीत, ते आत बसले आहेत. जे पदाधिकारी आहेत त्यांना तुम्ही अडवले आहे. तुम्ही तरी राजकारण करू नका. पदाधिकारी बैठकीसाठी येतील. त्यांना सुद्धा प्रश्न मांडण्याचा अधिकार आहे. वगैरे शब्दात आक्रमक भूमिका घेतली.
यावर प्रांताधिकारी देवदत्त केकान, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी चर्चा करत हालचाल सुरू केली. अप्पर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून निवडक पदाधिकार्यांना प्रवेश देऊन तणाव शांत केला. त्यानंतर दहा मिनिटांनी वंचित आघाडीचे नेते किसन चव्हाण बैठकीसाठी आले त्यांना अडवल्यावर त्यांनी त्यांच्या स्टाईलने घोषणाबाजी सुरू केली. उपविभागीय अधिकारी डॉ. सुदर्शन मुंडे यांनी चर्चा करत त्यांना प्रवेश दिला.
मात्र या प्रकाराने नाराज झालेल्या भाजपा पदाधिकार्यांनी थेट पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या समोरच बैठक मारून ठिय्या केला. यामुळे प्रशासनाची एकच धांदल उडाली. यावर भाजपा पदाधिकार्यांना खुर्च्यांची व्यवस्था करत आमदार मोनिका राजळे यांना सन्मानाने पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शेजारी खुर्ची देण्यात आल्यानंतर या वादावर पडदा पडला.
प्रामुख्याने तालुक्यात सत्ताधारी पक्षाच्या पालकमंत्री अथवा मंत्री यांची बैठक असतांना विरोधी पक्षाचे पदाधिकारी बैठकीला या ना त्या कारणाने बहिष्कार टाकत उपस्थित राहण्याचे टाळतात. मात्र आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या बैठकीला भाजपा पदाधिकारी उपस्थित राहीले. एवढेच नव्हे तर प्रवेश नाकारल्याने प्रशासनाला चांगलाच जाब विचारात धारेवर धरले.
बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत असतांना भाजपाच्या आमदार मोनिका राजळे व भाजपा पदाधिकारी आपली छाप पाडून गेले. या वादाचे पडसाद आगामी निवडणुकांवर उमटण्याची चिन्हे निर्माण झाली असून तालुक्यात भाजपा विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
pDHuNUogEiLIhyXl