त्यांना भगवानगड योजनेतील 35 गावे तरी माहीत आहेत का?
आमदार मोनिका राजळे यांचा विरोधकांना सवाल
पाथर्डी । वीरभूमी - 16-Aug, 2021, 12:00 AM
भगवानगड व 35 गावांच्या पाणी योजनेतील समाविष्ट असलेल्या 35 गावांची नावे तरी विरोधकांना माहिती आहेत का? विकास कामात खोडा घालून, पालकमंत्र्यांची दिशाभूल करून काहीही साध्य होणार नाही. योजनांचा अभ्यास, कामकाज पद्धती व निधीबाबत माहिती घेऊन व खात्री करूनच वक्तव्य करावे, असा सल्ला आमदार मोनिका राजळे यांनी विरोधकांचे नाव न घेता दिला.पाथर्डी नगरपालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. नाथनगर येथे मुख्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर हे होते.
यावेळी नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, श्री तिलोक संस्थेचे सचिव सतिष गुगळे, जि.प. सदस्य राहुल राजळे, सभापती सुनीता दौंड, नगरसेवक बजरंग घोडके, महेश बोरुडे, रमेश गोरे, माजी उपनगराध्यक्ष बंडूशेठ बोरुडे, शहराध्यक्ष अजय भंडारी, पंचायत समिती सदस्य सुनील ओहोळ, विष्णुपंत अकोलकर, सुभाष केकान, वृद्धेश्वर कारखान्याचे उपाध्यक्ष आबासाहेब काकडे, नगरसेवक, नगरसेविका तसेच भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना आ. राजळे म्हणाल्या की, आपणास मागील सरकारच्या काळात मुख्यमंत्री फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, मंत्री मुनगंटीवार यांच्याकडून मोठा निधी मतदार संघासाठी व शहरासाठी आणता आला. अनेक विकासकामे अंतिम टप्प्यात असून कामाचा दर्जा चांगला राखला जाईल. परंतु विरोधकांनी विकास कामात सहकार्य नाही तर किमान अडथळे आणु नयेत. परंतु राजकारण व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून खोटे आरोप करून संभ्रम निर्माण केला जात आहे.
विरोधकांना निवडणुकांची घाई झाली आहे. कोणतीही माहिती न घेता, अभ्यास न करता काहीही खोटे आरोप केले जातात. लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांना प्रश्न मांडण्याचा अधिकार असतानाही बैठकीला प्रवेश नाकारला जातो, हा प्रकार दुर्दैवी आहे. अतिरेकी असल्यासारखी वागणूक व दंगल सदृश्य परिस्थिती असल्यासारखा पोलिस बंदोबस्त ठेवला जातो.
आढावा बैठकीस भाजपच नव्हे तर शिवसेनेच्या पदाधिकार्यांना ही प्रवेश नाकारला. तालुक्यातील विरोधकांना कोणतीही शासकीय योजना माहित नाही. कोठून निधी मिळवला जातो हेही माहीत नाही. भगवानगड व 35 गावांच्या योजनेमधील 35 गावांची नावे तरी त्यांना माहीत आहेत का? असा सवाल करत विरोधकांनी जिल्हा परिषद अंतर्गत सत्ता असताना ही कोणतेही काम केले नाही.
विरोधकांची अशी दृष्टी व दृष्टिकोन चांगला नाही. पालकमंत्र्यांना चुकीची माहिती व मार्गदर्शन करणारी मंडळी जिल्ह्यात असून पालकमंत्र्यांना तशी माहिती जाणीवपूर्वक पुरवल्या जाते. असा आरोपही राजळे यांनी केला. भविष्यात कोणत्याही कामाचे श्रेय न घेता सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवू, विकासासाठी काही कटू निर्णय घ्यावे लागले तर त्यासाठी चर्चेतून मार्ग काढू. अशी ग्वाही यावेळी आ. राजळे यांनी दिली.
विकास निधीसाठी संघर्ष करावा लागला. निधी नसतानाही अनेक विकासकामे केली. शहराच्या भविष्याचा विचार करून विकासकामे केली जात आहेत, असे आ. राजळे यांनी यावेळी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन गटानी यांनी केले तर महेश बोरुडे यांनी आभार मानले.
Tags :
Comments