अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन
राजेश गायकवाड । वीरभूमी- 17-Aug, 2021, 12:00 AM
संगमनेर ः अंगणवाडी सेविकांना मोबाईल वरून शासनाला लाभार्थींचे वजन, उंची, आहार इत्यादी माहिती पाठवावी लागते. यामुळे पोषण ट्रॅकचे काम करणे अवघड झाले आहे. यामुळे मंगळवारपासून मोबाईल वापसी आंदोलन सुरु केले, असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्षा अॅड. निशाताई शिवूरकर यांनी दिली.
याबाबत माहिती देतांना म्हटले आहे की, शासनाने अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले असले तरी ते 2 जीबी रॅमचे आहेत. त्यांची वॉरंटी संपली आहे. मोबाईल नादुरुस्त झाल्यानंतर दुरुस्तीसाठी तीन ते आठ हजार रुपये खर्च येतो. हा खर्च सेविकांकडून वसूल केला जातो.
अंगणवाडी कर्मचारी कृतीसमितीने वारंवार महाराष्ट्र शासनाकडे या संदर्भात मोबाईल सेट बदलून देण्याची मागणी केली. परंतू निधीचे कारण देत सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सेविकांना पोषण ट्रॅकचे काम करणे मुश्किल झाले आहे.
यामुळे राज्यभर अंगणवाडी कर्मचारी यांनी निकृष्ट मोबाईल शासनाला परत देण्याचे आंदोलन मंगळवार पासून सुरु केले आहे. संगमनेर, घारगाव प्रकल्प 1 तसेच घारगाव प्रकल्प 2 आणि 24 ऑगस्ट रोजी अकोले व राजूर प्रकल्पातील मोबाईल परत करण्यात येतील, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्ष सत्यभामा थिटमे आणि जिल्हा सरचिटणीस भारती धरत यांनी दिली आहे.
सर्व अंगणवाडी कर्मचार्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पूजा घाटकर, इंदुमती घुले, समिना शेख, क्रांती गायकवाड, रेखा अवसरकर, बेबी हरनामे, सुनंदा कदम, अनुसया वराडे तसेच शांताराम गोसावी आदींनी केले आहे.
Comments