शेवगाव-पाथर्डीत पावसाने हाहाकार
शेवगाव, पाथर्डी । वीरभूमी- 31-Aug, 2021, 12:00 AM
सोमवारी सायंकाळपासून पडणार्या संततधार पावसामुळे शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील नदी - नाले एक झाले असून अनेक गावांत पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.
पूरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी जनावरे वाहुन गेल्याच्या घटना घडल्या आहेत. कोरडगाव, आखेगाव, पागोरी पिंपळगाव, वाळुंज, खरडगाव, वरुर, भगूर आदी गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे.
सोमवारी सायंकाळपासून शेवगाव-पाथर्डीसह जिल्ह्यात सर्वदूर जोरदार पावसाने हजेरी लावली. शेवगाव- पाथर्डीच्या डोंगर भागात अतिवृष्टी झाल्याने शेवगाव व पाथर्डी तालुक्यांना पूर आला आहे. यामुळे नदी काठच्या गावातील सखल भागात नदीचे पाणी शिरल्याने काही ठिकाणी जनावरे वाहुन जाण्याच्या घटना घडल्या आहेत.
कोरडगाव येथे गोठ्याचे पाईप अंगावर पडल्याने म्हशीचा मृत्यू झाला आहे. ठाकुर पिंपळगाव येथे शेळ्या वाहुन गेल्या आहेत. वरुर गावातही जनावरे वाहुन जाण्याची घटना घडली आहे. अचानक आलेल्या पुरामुळे नदी काठच्या गावांना मोठा फटका बसला आहे. आखेगाव येथील रामकिसन काटे, अमोल काटे, अशोक काकडे, भानुदास पालवे यांची घरे पडली आहेत.
अनेक रस्त्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहने अडकून पडली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणची पिके पाण्याखाली गेली आहेत. अगोदर पाऊस नसतांना चिंतेत असलेला शेतकरी अतिवृष्टीने पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.
शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील पूरपरिस्थितीमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी शेवगाव व पाथर्डी तालुक्यात प्रशासन यंत्रणा कामाला लागली आहे. तर राजकीय नेत्यांनी संकटात सापडलेल्यांना दिलासा आहे.
पूर परिस्थितीत दिलासा देण्यासाठी आ. मोनिका राजळे यांनी अनेक ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी नागरिकांना दिलासा देत प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सुचना देत मदतकार्य करण्याचे आदेश दिले आहेत.
Comments