शेवगाव । वीरभूमी- 07-Sep, 2021, 12:00 AM
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे जीवंत काडतुसासह गावठी कट्टा बाळगणार्या दोघांना शेवगाव पोलिसांनी शिताफिने अटक केली आहे. अटक केलेल्यामध्ये राहुल हिंमतराव शितोळे (वय 19, रा. बालमटाकळी, ता. शेवगाव) व कुमार भानुदास शिंदे (वय 23 वर्षे, रा. पानेवाडी, ता. घनसांगवी, जि. जालना) अशी आहेत.
ही कारवाई मंगळवार दि. 7 रोजी दुपारी 3.30 वाजेच्या दरम्यान शेवगाव- गेवराई राज्य मार्गावरील बालमटाकळी येथे केली. एक आरोपी जालना जिल्ह्यातील असल्याने जालना ते शेवगाव असे गावठी कट्टा कनेक्शन पोलिसांना शोधावे लागणार आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी परिसरात गावठी कट्टा खरेदी-विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती शेवगावचे पोलिस निरक्षक प्रभाकर पाटील यांना गुप्त खबर्यामार्फत मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर पोनि. पाटील यांनी पोकाँ. पी. बी नाकाडे, पो. काँ. किशोर शिरसाठ, प्रवीण बागुल, दिलीप राठोड यांच्या पथकाला सदरील ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश दिले.
यावरून वरील पथक शेवगाव - गेवराई राज्य मार्गाने बालमटाकळी येथे जात असतांना आरोपींनी पोलिसांना पाहुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी शिताफिने पळून जाणार्या दोघांना ताब्यात घेत झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडे गावठी बनावटीचे 25 हजार रुपये किंमतीचा सिल्व्हर व काळ्या रंगाचा लोखंडी कट्टा, एक हजार रुपये किंमतीचे दोन जीवंत काडतुस आढळून आली.
ताब्यात घेतलेल्या दोघांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आपली नावे राहुल हिंमतराव शितोळे (वय 19, रा. बालमटाकळी, ता. शेवगाव) व कुमार भानुदास शिंदे (वय 23 वर्षे, रा. पानेवाडी, ता. घनसांगवी, जि. जालना) अशी सांगितली. गावठी कट्टा व जीवंत काडतुसासह ताब्यातील दोघे वापरत असलेल्या बुलेट व पल्सर या गाड्याही चोरीच्या असल्याचे आढळून आले.
शेवगाव पोलिसांनी या दोघांना अटक करून गावठी कट्टा, दोन जीवंत काडतुस, एक लाख रुपये किंमतीची बुलेट, 75 हजार रुपये किंमतीची पल्सर (दोन्ही गाड्या विनानंबरच्या) ताब्यात घेतल्या आहेत. यावेळी पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र बागुल, पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे यांच्यासह पो.काँ. पी. बी. नाकाडे, किशोर शिरसाठ, प्रविण बागुल, दिलीप राठोड, बप्पासाहेब धाकतोडे आदी उपस्थित होते.
गावठी कट्ट्यासह चोरीच्या दुचाकी आढळल्याने यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का? गावठी कट्टा कशासाठी वापरला जाणार होता, याचा तपास शेवगाव पोलिस करत आहेत. या घटनेचा पुढील तपास सपोनि. रवींद्र बागुल हे करत आहेत.
Comments