पाथर्डी । वीरभूमी- 07-Sep, 2021, 12:00 AM
पाथर्डी-शेवगाव तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थिती मुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत. तसेच 60 गावात निर्माण झालेल्या पाणीटंचाईला दूर करण्यासाठी तातडीने टँकर उपलब्ध करावेत, अशा सूचना आमदार मोनिका राजळे यांनी विविध विभागातील अधिकार्यांना दिल्या.
अतिवृष्टी व पूर परिस्थिती संदर्भात आमदार मोनिका राजळे यांनी पाथर्डी तहसील कार्यालयात शेवगाव- पाथर्डी मतदार संघातील सर्व खात्यांच्या आधिकार्यांची आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार राजळे बोलत होत्या.
याप्रसंगी प्रांताधिकारी देवदत्त केकान, जि. प. सदस्य राहुल राजळे, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, पंचायत समितीचे गटनेते सुनील ओव्हळ, भाजपा अध्यक्ष माणिक खेडकर, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन बाळासाहेब अकोलकर, पाथर्डीचे तहसीलदार श्याम वाडकर, शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे, पाथर्डीच्या गटविकास अधिकारी शितल खिंडे, शेवगावचे गटविकास अधिकारी महेश डोके, पाथर्डी पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, शेवगाव पालिकेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ आदी उपस्थित होते.
जायकवाडी पाणीपुरवठा योजनेचा जॅकवेल व जलशुद्धीकरण केंद्रावरील साठवणूक टँक पूराच्या पाण्यामुळे गाळाने भरली आहे. यामुळे गेल्या दहा ते बारा दिवसापासुन पाथर्डी - शेवगाव शहरासह 60 गावातील पाणीपुरवठा पुर्णपणे बंद आहे.
याबाबत दोन्ही नगरपालिकेचे मुख्याधिकारी व संबधित अधिकार्यांना परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, नागरिकांचे पाण्यावाचून हाल होत असल्याने तातडीने टँकर सुरू करा, असे सांगत खडे बोल सुनावले. तर इतर काही विभागांच्या अधिकार्यांवर प्रश्नांची सरबत्ती करत चांगलेच धारेवर धरून कामात बदल करण्याच्या सूचना दिल्या.
तसेच गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाबद्दल संबंधित अधिकार्यांना ही आमदार राजळे यांनी चांगलेच खडसावले. राष्ट्रीय महामार्गाच्या अर्धवट असलेल्या कामामुळे पाथर्डी शहरातील अनेक दुकानात तसेच ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरून मोठे नुकसान झाले.
या सर्व ठिकाणचे अर्धवट असलेल्या रस्ता व गटारींची कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यापुढील काळात अधिकारी-ठेकेदार यांच्या चुकीमुळे अपघात घडल्यास अथवा कुठल्याही प्रकारचे नुकसान झाल्यास गुन्हे दाखल करू, असे आमदार राजळे यांनी सांगितले.
OLSnRIeN