श्रीगोंदा । वीरभूमी - 12-Sep, 2021, 12:00 AM
‘नागवडे’ सहकारी कारखाना निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपांनी श्रीगोंदा तालुक्यातील सहकाराच्या राजकारणाचा भडका उडाला आहे. काही दिवसांपूर्वी बंडखोर माजी उपाध्यक्ष केशवराव मगर, जिजाबापू शिंदे, अण्णासाहेब शेलार, दीपक भोसले, वैभव पाचपुते व त्यांच्या सहकार्यांनी नागवडे कारखान्याच्या गैरव्यवहार व साखर टेंडर विक्रीप्रकरणी पत्रकार परिषद घेऊन जाहीर आरोप केले होते.
त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी शनिवार दि. 11 रोजी कारखाना विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेऊन विरोधी संचालकांचे आरोप खोडून काढले.
यावेळी बोलताना राजेंद्र नागवडे म्हणाले की आदरणीय बापूंनी जसा कारभार केला त्याच दिशेने आम्ही सर्व संचालक काम करत आहोत. बापूंच्या संस्काराचा, कारभाराचा व सभासदांच्या विश्वासाचा आमच्यावर एकप्रकारचा धाक आहे. त्याला विद्यमान संचालक मंडळ कधीही तडा जाऊ देणार नाही. कारखान्याचे सर्व निर्णय, चर्चा संचालक मंडळाच्या सामूहिक बैठकीत सर्वांना विश्वासात घेऊनच केले जातात. आरोप करणारे केशवराव मगर, अण्णासाहेब शेलार हे गेल्या पाच वर्षात कोणत्याही बैठकीला हजर नसतात.
वार्षिक सर्वसाधारण सभा सोडली तर एक तासही कारखान्यावर त्यांची हजेरी नाही. संचालक मंडळ सर्व खरेदी-विक्री, साखरेचे दर कारखाना हित पाहूनच करण्यात येते. मगर - शेलार व आमच्यात कुठलाही संघर्ष नाही. केवळ राजकीय प्रेरित होऊन कारखान्याची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे.
साखर विक्री टेंडर आम्ही आधीच रद्द केले असून आम्हालाही सभासदांचे हित चांगलेच कळते. चांगल्या कारभारावर नाहक पत्रकार परिषदा घेऊन टिका करण्याचे काम सुरू आहे. कारखान्याचे कामकाज कधीही घरी बसून करत नाही. कारखान्याला 74 लाखांचा नफा झाल्याने ऑडिट ‘अ’ वर्ग मिळाला आहे.
लवकरच पूर्ण क्षमतेने को-जन चालू करून डिस्टीलरी चालू करणार आहोत. बिनबुडाच्या आरोपांना सभासद कधीच भुलणार नाही. सभासदांच्या विश्वासावर परत एकदा आम्ही कारखाना निवडणूक जिंकणार आहोत. असे राजेंद्र नागवडे यांनी झालेल्या आरोपांना उत्तर देताना म्हटले आहे.
यावेळी व्हा. चेअरमन युवराज चितळकर, संचालक सुभाष शिंदे, अरुण पाचपुते, अॅड. सुनील भोस, हेमंत नलगे, विश्वनाथ गिरमकर, राकेश पाचपुते, विलास काकडे, योगेश भोईटे, विजय कापसे, श्रीनिवास घाडगे, सचिन कदम व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.
sOLvmhaVRC