पाथर्डी । वीरभूमी- 13-Sep, 2021, 12:00 AM
मदत व पुनर्वसन मंत्रीपद जिल्ह्यात असूनही पूरग्रस्त शेतकर्यांना अद्याप एक रुपयाची ही आर्थिक मदत मिळाली नाही. शेवगाव तालुक्यातील विकास विरोधकांना दिसत नाही तर फक्त जनतेत संभ्रम निर्माण केला जात आहे. पाथर्डी शहरातील (pathardi City) आक्रोश हा फक्त भूखंड माफिया व नेत्यांचा (The outrage is only against the land mafia and leaders) चालू आहे, अशी घणाघाती टीका आमदार मोनिकाताई राजळे (monika rajale) यांनी विरोधकांचे नाव न घेता केली.
पाथर्डी शहरातील एका कार्यक्रमात आ. राजळे बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर हे होते. यावेळी नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, मुख्याधिकारी संतोष लांडगे, पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड, भाजपचे नेते अशोक चोरमले, नगरसेवक रमेश गोरे, महेश बोरुडे, बजरंग घोडके, प्रवीण राजगुरू, मंगल कोकाटे, सुनिता बुचकुल, शारदा हंडाळ आदी उपस्थित होते.
आमदार राजळे म्हणाल्या की, शहराच्या विकासासाठी नगरपालिकेच्या वतीने सुनियोजित पद्धतीने काम चालू आहे. शहराचे विस्तारीकरण होत असतांना विकासकामांसाठी निधी मिळवतांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. तालुक्यात मागील काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचा फटका बसला. नैसर्गिक संकटात अनेकांनी दौरे केले. फोटोसेशन केले. परंतु सरकारने आपत्तीग्रस्तांना अद्यापपर्यंत एक रुपयाची देखील आर्थिक मदत केली नाही.
शासन शेतकर्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. कोकण, सातारा, सांगली प्रमाणे शेवगाव-पाथर्डी तालुक्यातील शेतकर्यांना तातडीने मदत करावी. कोरोनामुळे निधी मिळण्यास उशीर झाल्यामुळे विकासकामांना विलंब झाला. परंतु शहराच्या विकासाची सर्व कामे लवकरच पूर्णत्वास जातील, असा विश्वास आ. राजळे यांनी व्यक्त केला.
नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे यांनीही विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. यावेळी नगराध्यक्ष म्हणाले की, शहरातील विकासकामांसाठी अनेक अडचणींवर मात करून निधी मिळत आहे. राज्य सरकारकडून विकासकामांना निधी मिळत नाही. मात्र विरोधक पालिकेला व सत्ताधार्यांना बदनाम करण्यासाठी षडयंत्र रचत आहेत. विरोधकांना जनतेला सांगायला कुठलाही मुद्दा नसल्याने आमच्यावर भ्रष्टाचाराचे खोटे व चुकीचे आरोप केले जात आहेत. मागील साडेचार वर्षात विरोधकांकडून एकही शब्द उच्चारला गेला नाही. कुठलाही आवाज उठवला गेला नाही.
आता मात्र आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विरोधक बोलत आहेत.
तांत्रिक अडचणीमुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित झालेला आहे. हे माहीत असूनही विरोधकांनी शहरात बॅनरबाजी केली. शहराच्या पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्याऐवजी पालिकेची अडवणूक करण्यात विरोधकांनी धन्यता मानली. पाणी योजना जिल्हा परिषदेकडे आहे. पालिकेची कोणतीही थकबाकी नाही. जिल्हा परिषदेत सत्ता त्यांची असतानाही पालिकेची बदनामी केली जात आहे. शहरातील शांतता व सुसंस्कृत राजकारण भाजपा संपवू देणार नाही, असा इशाराही गर्जे यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी पंचायत समितीचे गटनेते सुनील ओहोळ, पंचायत समिती सदस्य विष्णुपंत आकोलकर, सुभाष केकान, माजी उपनगराध्यक्ष बंडू बोरुडे, पांडूरंग सोनटक्के, आदिनाथ धायतडक आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश गोरे यांनी केले. सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केले तर बजरंग घोडके यांनी आभार मानले.
Comments