कुकडी प्रकल्पाच्या समस्यांचे होणार निराकरण
शरद पवार यांची ग्वाही । घनश्याम शेलार यांची माहिती
श्रीगोंदा । वीरभूमी- 17-Sep, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यात कुकडी पाणी प्रश्नावरून संघर्ष उद्भवत आहे. भविष्यात हा संघर्ष निर्माण होऊ नये म्हणुन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कुकडी प्रकल्पाच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याची ग्वाही दिली असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी पत्रकार परिषदेत दिली.कुकडी प्रकल्प समूहाच्या येडगाव, वडुज, पिंपळगाव जोगे, डिंभे, माणिकडोह या प्रकल्पाच्या सिंचन अडचणी व नव्याने पाणी उपलब्ध करण्यासाठी मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधी आ. संजय शिंदे, आ. रोहित पवार, आ. निलेश लंके, आ. अशोक पवार, माजी आमदार राहूल जगताप, राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, अण्णासाहेब शेलार व सिंचन विभागाच्या अधिकार्यांसह गुरुवार दि.16 रोजी बैठक पार पडली.
या बैठकीत झालेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुल जगताप व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांना माहिती दिली.
पत्रकार परिषदेत या तीनही नेत्यांनी प्रथमतः कुकडी प्रकल्पाच्या कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी जवळपास दोन तास चाललेल्या बैठकीत शरद पवार यांनी बारकाईने सर्व समस्या जाणून घेऊन कायमस्वरूपी अडचणी दूर करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांचे आभार मानले. यावेळी घनश्याम शेलार म्हणाले की, राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प, सर्वाधिक सिंचन व सर्वात जास्त लांबी असलेल्या कुकडी डाव्या कालव्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी अडचणी दूर करण्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला.
टेल टू हेड या न्यायाने याचा सर्वाधिक फटका श्रीगोंदा तालुक्याला बसत आहे. प्रत्येक आवर्तनात श्रीगोंदा तालुक्याला 600-700 एमसीएफटी पाणी कमी पडत असल्याने संघर्ष उद्भवत आहे. या बैठकीत डिंभे ते माणिकडोह बोगदा होण्यासाठी निधी उपलब्ध करुन डिंभे ते येडगाव 55 किलोमीटर कालवा दुरुस्ती, कुकडी मुख्य कालव्याची दुरुस्ती, पिंपळगाव जोगे धरणाची उंची वाढवणे, कालव्याचे लायनिंग करणे यासाठी अपेक्षित निधी उपलब्ध करणे. याशिवाय घोडसह कुकडी प्रकल्पातील धरणांमधील गाळ काढणे याला प्राथमिकता देऊन येणार्या सर्व समस्यांवर कायमचा तोडगा काढण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली अशी माहिती शेलार यांनी दिली.
यावेळी राहुल जगताप म्हणाले की, पवार साहेबांनी कुकडी लाभक्षेत्रातील शेतकर्यांना न्याय देण्याची भूमिका घेऊन घाट माथ्यावरील कोकणात जाणारे अतिरिक्त पाणी वळवून जवळपास 3 टीएमसी ज्यादा पाणीसाठा करणे. व येणार्या अडचणींचा कायमस्वरूपी निपटारा करणे याबाबत चर्चा झाली. महाविकास आघाडी शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य देत आहे. प्रत्येक गोष्ट कृतीतून दाखवणे ही कामाची पध्दत हे सरकार अंगिकारत आहे. येणार्या काळातही आदरणीय शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाची घोडदौड सुरूच राहणार आहे.
घोड डाव्या कालव्याच्या दुरावस्थेबाबत घनश्याम शेलार यांना विचारले असता ते म्हणाले की, घोड कालवा अस्तरीकरण व वितरीकांच्या दुरुस्तीसाठी 40 कोटी रुपयांचा निधी आला होता. आ. बबनराव पाचपुते यांचे नाव न घेता शेलार यांनी आरोप केला की, तत्कालीन आमदारांनी ठेकेदाराला टक्केवारी मागितल्याने तो निधी परत गेला. त्यावेळी ठेकेदाराने सांगितले की, काम न होताही माझ्याकडून काही रक्कम उकळली. अवाढव्य पैशाची मागणी होत असल्याने कोणताच ठेकेदार कामे करण्यास धजावत नाही.
KRxeJSUPL