रियल इस्टेट, ट्रेडिंग, मार्केटिंग व इतर उद्योगातून गुंतवणूकीचा विचार करावा
मधुकरराव नवले यांचे मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थाना आवाहन
अकोले । वीरभूमी- 19-Sep, 2021, 12:00 AM
केंद्र व राज्य सरकारने घातलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थानी सभासदांचे हित लक्षात घेऊन भविष्यात गुंतवणुकीच्या नवनवीन संधी शोधण्याची गरज आहे. चांगले कर्जदार मिळत नसल्याचा बिकट प्रश्न सर्वच वित्तीय संस्थांसमोर उभा ठाकलेला आहे. म्हणूनच यापुढील काळात ठेवी स्वीकारणे व कर्ज वितरण करणे यावरच अवलंबून न राहता रियल इस्टेट, ट्रेडिंग, मार्केटिंग व इतर व्यापार उद्योगात विश्वासपात्र गुंतवणूक करण्याचा विचार करावा, असे आवाहन बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांनी केले.महाराष्ट्र व मध्यप्रदेश कार्यक्षेत्रात 7 शाखांमधून आर्थिक क्षेत्रात उल्लेखनीय कामकाज करीत ठेवीदार व सभासदांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या अकोले येथील बुवासाहेब नवले मल्टिस्टेट को-ऑपरटीव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड संस्थेची 10 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उद्योजक व संस्थेचे अध्यक्ष विक्रम मधुकर नवले यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी (18 सप्टेंबर) ऑनलाईन व संस्थेच्या सभागृहात खेळीमेळीत पार पडली.
प्रारंभी संस्थचे संचालक रमेश नाईकवाडी यांनी अध्यक्षीय सूचना केली त्यास संचालक एकनाथ सहाणे यांनी अनुमोदन दिले. संचालक महिपाल तथा बबनराव देशमुख यांनी अहवाल सालातील दिवंगताना श्रद्धांजली समर्पित केली. कार्यकारी संचालक विलास नवले यांनी विषय पत्रिकेचे वाचन करून अहवाल, तरीज, ताळेबंद व नफातोटा पत्रक सादर केले. सर्व विषयांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यावेळी उपस्थित सभासदांना मार्गदर्शन करताना जेष्ठ नेते मधुकरराव नवले बोलत होते.
ते म्हणाले की, ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांच्या तुलनेत मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थाना उद्योग व्यवसायात काम करण्यास अधिक वाव आहे. सभासदांच्या ठेवीतून सभासदांना आर्थिक हितकारक ठरेल असे खुले व्यावसायिक धोरण स्वीकारून मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थांना अधिक सतर्क व सजग राहून आर्थिक व्यवहारांसंदर्भातील कामकाज करण्याचे अधिकार आहेत.
नोटबंदीतील शासकीय निर्बध व कोरोना सारख्या आपत्कालीन परिस्थितीतसुद्धा बुवासाहेब नवले ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था व बुवासाहेब नवले मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट संस्थेच्या ठेवी व आर्थिक व्यवहारांवर प्रतिकूल परिणाम झाले नाहीत, याउलट ठेवीत वाढच झाली. याचे प्रमुख कारण सभासद व ठेवीदारांचा संस्थेवर असलेला अतूट विश्वास आहे. यामुळेच या संस्थेस प्रतिकूल परिस्थितीतही 20 लाख रुपयांहून अधिक निव्वळ नफा मिळाला.
यावेळी बोलताना मधुकरराव नवले म्हणाले, नोटबंदीने वित्तीय संस्थांचे आर्थिक कंबरडेच मोडेल ही भीती नंतरच्या काळात कमी होत गेली. कोरोना सारख्या आपत्कालीन स्थितीत ठेवींचा ओघ घटन्याऐवजी वाढतच गेला. मात्र तुलनेत चांगले कर्जदार न मिळाल्याने नफ्यात घट झाली. थकबाकी वसुलीस अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार एनपीएत खाते जाऊ नयेत म्हणून पुनर्जीवन करण्यात आले, पण प्रत्यक्ष वसुल होत नव्हता. यामुळे वित्तीय संस्थांचे अर्थचक्र मंदावले. त्यास बुवासाहेब नवले संस्थांही अपवाद ठरल्या नाहीत.
पण आपण पहिल्यापासूनच तरलता व सीडी रेशो बाबतीत कटाक्षाने लक्षपूर्वक उत्तम समन्वय राखत आल्याने बुवासाहेब नवले संस्था या सर्व बाबतीत दमदार व सक्षम ठरल्या आहेत. यापुढील काळात सभासदांना अधिकाधिक सेवासुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच शासनाच्या आर्थिक धोरणांचा अवलंब करून गुंतवणूक क्षेत्रात उल्लेखनीय नवनवीन गुंतवणूक करण्याचे धोरण स्वीकारण्याचे संकेत मधुकरराव नवले यांनी दिले.
वार्षिक सर्वसाधारण सभेस ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थांचे उपाध्यक्ष रमेश जगताप, मंदाबाई नवले, आनंदराव नवले, दिगंबर म्हसे, कार्यकारी संचालक दादाभाऊ झोळेकर, कायदे विषयक मार्गदर्शक विधिज्ञ बी. आर. आरोटे, भास्कर नवले, संस्थेचे अध्यक्ष विक्रम नवले, उपाध्यक्ष नवनाथ वाळूंज, जेष्ठ संचालक संदीप शेटे, रमेश नाईकवाडी, श्रीकांत नवले, महिपाल देशमुख, रघुनाथ शेणकर, मदन आंबरे, एकनाथ सहाणे, कपिल रासणे, सचिन जगताप, सुनेत्रा वाकचौरे, रचना बाळसराफ, कार्यकारी संचालक विलास नवले, सुजित नवले, न्यु इंडीया इन्शुरन्स कंपनीचे विकास अधाकारी अनिल वाकचौरै उपस्थित होते.
यावेळी संसंस्थेचे आर्थिक स्थिती विषद करताना संस्थेचे अध्यक्ष विक्रम नवले म्हणाले, संस्थेचे 31 मार्च 2021 पर्यंत एकूण भागभांडवल 43 लाख 51 हजार 160 रुपये असून एकूण ठेवी 89 कोटी 90 लाख 12 हजार 34 रुपये आहेत. कर्ज वितरण 45 कोटी 25 लाख 88 हजार 259 रुपये असून गुंतवणूक 25 कोटी 78 लाख 34 हजार 271 रुपये आहेत. तर नफा 20 लाख 57 हजार 958 रूपये आहे. सी डी रेशो 50.43 टक्के असून तरलात 28.87 टक्के आहे. अकोले तालुक्यातील ही एकमेव मल्टिस्टेट को-ऑपरटीव्ह क्रेडिट संस्था आहे. शेवटी उपाध्यक्ष नवनाथ वाळूंज यांनी आभार व्यक्त केले.
Comments