शिकार्याच्या जाळ्यात अडकला होता बिबट्या
श्रीगोंदा । वीरभूमी- 20-Sep, 2021, 12:00 AM
श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरी येथील डोमाळवाडीतील मदनेवस्तीजवळ भुजबळ यांच्या गट. नं. 93 मधील शेतात शिकार्यांनी जंगली प्राणी पकडण्याच्या उद्देशाने सापळा लावला होता. रविवार दि. 19 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या सापळ्यात अडकून सुटका करण्याच्या धडपडीत जखमी झाल्याने बिबट निवारा केंद्रावर जाण्याआधीच त्याचा मृत्यू ओढवला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वांगदरी शिवारात मदनेवस्ती येथील गट नं.93 मधील शेतात जंगली प्राण्याच्या शिकारीच्या उद्देशाने अज्ञात शिकार्यांनी जाळे लावून सापळा रचला होता. या परिसरात ऊसाची शेती आहे. भक्ष्याच्या शोधात निघालेला बिबट्या अचानक या जाळ्यात सापडला.
बिबट्याला पाहून परिसरातील शेतकर्यांनी वनविभागाला तात्काळ कळवले. बिबट्याची सुटका करण्यासाठी जिल्हा वन अधिकारी सुवर्णा माने यांनी मोबाईल स्कॉड, माणिकडोह येथील वन्यप्राणी बचाव पथक व पोलिसांना पाचारण केले.
या रेस्क्यू टीमने बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन जुन्नर येथील बिबट निवारा केंद्राकडे पुढील उपचारासाठी नेत असताना वाटेतच बेलवंडी नजीक त्याचा मृत्यू झाला. बेलवंडी येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात बिबट्याचे शवविच्छेदन करून त्याच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.
शवविच्छेदनात प्राथमिक अहवालानुसार बिबट्या जखमी अवस्थेत असल्याने भूक व मोठ्या प्रमाणात निर्जलीकरण झाल्याने मृत्यू ओढवल्याचा निष्कर्ष निघाला आहे.
या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये जिल्हा वन अधिकारी सुवर्णा माने, कर्जत तेथील वनपरिक्षेत्रपाल मोहन शेळके, श्रीगोंदा येथील वनपरिक्षेत्रपाल भोगे साहेब, सहाय्यक वनसंरक्षक देवखिळे, वनकर्मचारी गुंजाळ, घालमे यांनी सहभाग घेतला.
hgYdGPwVOpr