तहसीलदारांच्या निरोप व स्वागत समारंभाला कोरोनाचा पडला विसर
शेवगाव । वीरभूमी - 22-Sep, 2021, 12:00 AM
दोन दिवसापुर्वीच विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी कोरोना उपाययोजना आढावा बैठक घेऊन प्रशासनाला मास्क न वापरणे, गर्दी करणे व नियम मोडणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र कोरोना नियमांची पायमल्ली करत शेवगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात नवीन तहसीलदारांचे स्वागत तर जुन्या तहसीलदारांना निरोप देण्यात आला.
एवढेच नव्हे तर निरोप व स्वागत समारंभानंतर जेवणावळीही उठल्या. दोन महिण्यापुर्वी नियमांचा भंग करणार्या नवरदेव, नवरीसह आई-वडिलांवर व लॉन्स मालकावर गुन्हे दाखर करत कारवाई करणार्या महसूल प्रशासनानेच नियम मोडल्याने कोण कारवाई करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शेवगावच्या तहसीलदार अर्चना पागिरे यांची बदली होऊन त्यांच्या जागेवर नूतन तहसीलदार म्हणुन छगन वाघ यांची नेमणुक झाली आहे. यामुळे शेवगाव तहसील कार्यालयातील सभागृहात जुन्या तहसीलदारांना निरोप व नूतन तहसीलदारांचे स्वागत करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र हा कार्यक्रम घेतांना कोरोना नियमांची पायमल्ली करण्यात आल्याची बाब समोर आली आहे.
हा कार्यक्रम महसूल संघटनेच्या पुढाकारातून झाला. या कार्यक्रमाला शेवगाव ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकिय अधिकारी, निवासी नायब तहसीलदार, नायब तहसीलदार अव्वल कारकून, मंडलाधिकारी, तलाठी व तहसील कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी चांगले काम केल्याने तहसीलदार व महसूल कर्मचार्यांचे कौतूक होत असतांना अशी नियमांची पायमल्ली केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
विभागिय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या. एवढेच नाही तर कोरोनाची तिसरी लाट अहमदनगर जिल्ह्यातून येण्याची भिती व्यक्त करत प्रशासनाला नियम मोडणार्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना केल्या होत्या. मात्र याच सुचनांची वरीष्ठ अधिकार्यांच्या उपस्थितीतच पायमल्ली केल्याने यांच्यावर कारवाई कोण करणार? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे.
Comments