अखेर राज्यातील धार्मीक स्थळे, मंदिरे उघडण्याचा मुहूर्त ठरला
मुंबई । वीरभूमी- 24-Sep, 2021, 12:00 AM
सोमवार दि. 4 ऑक्टोबर पासून शाळा सुरू होण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील धार्मीक स्थळे, मंदिरे दि. 7 ऑक्टोबर पासून उघडण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाने भाविकांसह भाजपाने समाधान व्यक्त केले आहे.
अनेक महिण्यापासून बंद असलेली मंदिरे, धार्मीक स्थळे उघडण्याची मागणी होत होती. एवढेच नव्हे तर मंदिरे उघडण्यासाठी भाजपाने आंदोलन केले होते. मात्र कोरोना संसर्गामुळे मंदिरे उघडण्याचे शासनाकडून टाळले होते.
मात्र राज्यातील कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांन टप्प्याटप्याने निर्बंध शिथिल केले जात आहेत. सध्या कोरोना संसर्ग कमी झाला असून राज्यातील शाळा दि. 4 ऑक्टोबर पासून उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील धार्मीक स्थळे, मंदिरे, प्रार्थनास्थळे दि. 7 ऑक्टोबर पासून खुले करण्याचा निर्णय घेतला आहे.
मंदिरे उघडण्यास परवानगी दिली असली तरी राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. यामध्ये मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझरचा वापर करावा लागणार आहे. याची जबाबदारी देवस्थान व्यवस्थापनाकडे देण्यात आली आहे.
मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपा, मनसे या राजकीय पक्षांनी आंदोलने केली होती. मात्र नुकताच झालेला गणेश उत्सवातही मंदिरे उघडण्यात आली नव्हती. मात्र राज्य शासनाने कोरोना संसर्गाचा आढावा घेत दि. 7 ऑक्टोबर पासून मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतल्याने भाविकांसह भाजपाकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
Comments