तीन गायी आणि चार बैलांची मृत्यूच्या दाढेतून सुटका
बोधेगाव । वीरभूमी- 30-Sep, 2021, 12:00 AM
शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील खाटीक गल्लीतील कत्तलखान्यावर शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या विशेष पथकाने छापा टाकून तीन गायी आणि चार बैलांची मृत्यूच्या दाढेतून सुटका केली. या पथाकाने ही कारवाई गुरुवार दि. 30 रोजी केली. याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, शेवगावचे पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार बोधेगाव येथे गुरुवारी आठवडा बाजार निमित्त जनावरांची कत्तल होणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीची खातरजमा केल्यानंतर डीवायएसपी मुंडे यांनी विशेष पथकाला दिलेल्या आदेशावरून या पथकाने गुरुवार दि. 30 रोजीच्या पहाटे चार ते पावणे पाचच्या सुमारास बोधेगाव येथील खाटीक गल्लीतील कत्तलखान्यावर छापा टाकला.
पथकाने छापा टाकला असता पत्र्याच्या शेडमध्ये तीन गायी व चार बैल यांची किंमत एकूण 52 हजार रुपये असे सात जनावरे कत्तलीसाठी आणल्याचे आढळून आले. या गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी आठवडा बाजारात आणण्यात येणार होते.
छापा टाकल्यानंतर पोलिसांनी संबधितांना जनावरांची खरेदी केल्याच्या पावत्याबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेत या गोवंशीय जनावरांची सुटका केली.
याप्रकरणी पोलीस कर्मचारी उमेश अर्जुन गायकवाड यांच्या फिर्यादीवरून छोटू अब्बास शेख (वय 32), समद चांद शेख (वय 40), सलीम अब्बास कुरेशी (वय 30) व कादरशहा इस्माईल कुरेशी (वय 30, सर्व रा. बोधेगाव) यांच्या विरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारित सन 2015 चे कलम 5(ब) (1) 9 व प्राण्यांस निर्दयतेने वागविण्यास प्राणी संरक्षक अधिनियम कलम 3, 11 प्रमाणे शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भगवान बडधे हे करीत आहेत. सात गोवंशीय जनावरांची पोलिसांनी सुटका केल्याने प्राणीमित्रांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
dTVCbYcB