अहमदनगर । वीरभूमी- 14-Oct, 2021, 12:00 AM
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटत असतांना अहमदनगर जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधितांची संख्या विचारात घेता जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सात तालुक्यातील 21 गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला आहे. जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने या गावांमध्ये 14 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या काळात कडक निर्बंध असणार आहेत.
याबाबत बुधवारी रात्री कडक निर्बंधाचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या सहीने जाहीर केले. या आदेशानुसार अहमदनगर जिल्ह्यातील दैनंदिन कोरोना बाधितांची संख्या 300 ते 500 दरम्यान आढळून येत आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट 3 ते 5 टक्के दरम्यान आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी ज्या गावांत कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे तेथे लॉकडाऊन जाहीर केला जात आहे.
मागील आठवड्यात जिल्ह्यातील 69 गावांमध्ये लॉकडाऊन जाहीर केला होता. त्याची मुदत संपुष्टात आली आहे. यानंतर आता पुन्हा जिल्ह्यातील 21 गावांमध्ये जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी 14 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर या काळात कडक निर्बंध जाहीर केले आहेत.
आज लॉकडाऊन जाहीर केलेल्या गावांमध्ये वीरगाव, सुगाव बु., कळस बु. (ता. अकोले), टाकळी (ता. कोपरगाव), चांदा (ता. नेवासा), जामगाव, वासुंदे, (ता. पारनेर), उंबरी, वेल्हाळे, चंदनापुरी, वडगाव पान, राजापूर, नांदुरी दुमाला, मालदाड, सुकेवाडी, ओझर बु., जोर्वे (ता. संगमनेर), पिंपळगाव माळवी (ता. नगर), लोणी व्यंकनाथ, घारगाव, कोथूळ (ता. श्रीगोंदा) अशा 21 गावांचा समावेश आहे.
लॉकडाऊन जाहीर केलेल्या गावांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व अस्थापना व दुकाने बंद असणार आहे. तसेच या परिसरातून अत्यावश्यक सेवा व कृषी माल वाहतूक वगळता इतर वाहतुकीस निर्बंध असणार आहेत. तसेच पाच व पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास निर्बंध जाहीर केले आहेत.
नागरिकांनी कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
Comments