जुन्या पिढीने वाढविलेला सहकार नवी पिढी उत्तमरीत्या सांभाळतेय
आमदार सुधीर तांबे । नागवडे कारखान्याचा 47 व्या गाळप हंगामाचा शुभारंभ
श्रीगोंदा । वीरभूमी- 14-Oct, 2021, 12:00 AM
माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी कृषी, औद्योगिक विकासाचा पाया घालून सहकाराची गंगा खेडोपाडी पसरवली. या सहकार चळवळीची नगर जिल्ह्यात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, माजी मंत्री भाऊसाहेब थोरात, शिवाजीराव नागवडे, यशवंतराव गडाख, शंकरराव काळे, मारुतराव घुले यांनी मुहूर्तमेढ रोवली व सहकाराचा वटवृक्ष निर्माण केला. त्यांचीच नवी पिढी त्यांचा आदर्श घेत उत्तमरीत्या सहकारी संस्था सांभाळत असल्याचे गौरोद्गार आ. डॉ. सुधीर तांबे यांनी काढले.सहकारमहर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याच्या 47 वा गाळप हंगामाचा शुभारंभ नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे, श्रीरामपूरचे आमदार लहुजी कानडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात आ. तांबे बोलत होते.
याप्रसंगी आमदार लहूजी कानडे म्हणाले की, ज्येष्ठ मंडळींनी भांडवलदारांना टक्कर देत सहकार चळवळ सुरू केली. एकमुखी, एकहाती नेतृत्वाखाली ही चळवळ अधिक विकसित झाली. ज्या ठिकाणी नेतृत्व बदलत राहिले तेथील सहकार लयाला गेला आहे.
यावेळी चेअरमन राजेंद्र नागवडे म्हणाले की, एक-दोन वर्षात नागवडे कारखान्याचा नवीन प्लॅन्ट उभारणार आहोत. बापूंचा वारसा जपत सभासदांना वेळच्यावेळी बिले देत आहेत. कारखान्याचे उत्कृष्ट काम असल्यामुळे मला शासनाच्या वेगवेगळ्या समिती, संस्थेवर काम करण्याची संधी मिळत आहे. शासन निर्णयाप्रमाणे भाव देऊन लवकरच डीस्टीलरी, इथेनॉल प्रकल्प व 26 मेगावॅट क्षमतेचा सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू करणार आहे. या हंगामात जिल्ह्यात जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करणार आहे. येत्या 18 तारखेला प्रत्यक्ष गाळप सुरु होणार आहे.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ज्ञानदेव वाफारे यांची भाषणे झाली. तत्पुर्वी सकाळी 9 वाजता कारखान्याचे संचालक अॅड. सुनिल कांतीलाल भोस व त्यांच्या सुविद्य पत्नी मिनाताई सुनिल भोस, सभासद विठ्ठलराव जिजाबा भोयटे व त्यांच्या पत्नी विमलबाई विठ्ठलराव भोयटे, भाऊसाहेब बाबा बरकडे व त्यांच्या पत्नी भागुबाई भाऊसाहेब बरकडे, सुभाष प्रभाकर गोरे व त्यांच्या पत्नी शारदा सुभाष गोरे आणि भाऊसाहेब पर्वती खेतमाळीस व त्यांच्यापत्नी कल्पना भाऊसाहेब खेतमाळीस या उभयतांच्या शुभहस्ते वजन काटा व गव्हाणीची विधीवत पुजा करण्यात आली. त्यानंतर मान्यवर अतिथींच्या शुभहस्ते गव्हाणीत मोळी टाकली.
कार्यक्रमाला माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, जिल्हा बँकेच्या संचालिका अनुराधाताई नागवडे, माजी उपाध्यक्ष केशवराव मगर, जि. प. माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिलराव घनवट, नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे, पं. स. सभापती गितांजली पाडळे, संचालक अनिल पाचपुते, कैलास पाचपुते, माजी उपाध्यक्ष युवराज चितळकर, जिजाबापू शिंदे, अॅड. बाळासाहेब काकडे, शिवसेना तालुका प्रमुख बाळासाहेब दूतारे यांच्यासह तालुका पातळीवरील विविध संस्थांचे पदाधिकारी व राजकिय पक्षांचे तालुकाध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, दुध संघाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविक संचालक सुभाषराव शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन संचालक अॅड. अशोक रोडे यांनी केले तर प्रा. सुनिल माने यांनी आभार मानले.
FrdYCkisXDwf