हे विरोधक कारखाना वाचवण्यासाठी हातात हात घालून आले एकत्र
हे विरोधक कारखाना वाचवण्यासाठी हातात हात घालून आले एकत्र
अकोले । वीरभूमी- 15-Oct, 2021, 12:00 AM
अगस्ती कार्यस्थळावर गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी प्रथमच माजी मंत्री मधुकरराव पिचड व आ. डॉ. किरण लहामटे हे एकाच व्यासपीठावर आले होते. त्यामुळे ते दोघेही काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आज दोघांनीही अगस्ती वाचला पाहिजे ही भूमिका घेतली. तसेच दोघांनी हातात हात घेतल्याने सर्वानी टाळ्यांचा कडकडाट केला. त्यामुळे तालुक्यात राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली आहे.यावेळी माजीमंत्री मधुकर पिचड म्हणाले की, अगस्ती सहकारी साखर कारखाना ही तालुक्याची भाग्यलक्ष्मी असून आपण त्यामध्ये कोणतेही राजकारण आणायचे नाही ही संकल्पना घेऊन सर्वांच्या संमतीने व सर्व पक्षीयांना बरोबर घेऊन अगस्ती चालवून आगामी काळात अगस्ती स्वयंपूर्ण करु. तसेच चालू हंगामात उच्चांकी ऊसाचे गाळप करणार असल्याचे सांगितले.
अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा 28 वा गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री संस्थापक अध्यक्ष मधुकरराव पिचड, आ. डॉ. किरण लहामटे, व्हा. चेअरमन सीताराम पा. गायकर, योगी केशवबाबा चौधरी यांचे हस्ते गव्हाणीत मोळी टाकून करण्यात आला. यावेळी माजीमंत्री पिचड बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी मंत्री संस्थापक अध्यक्ष मधुकरराव पिचड होते. यावेळी विठ्ठलराव चासकर, भानुदास तिकांडे, जे. डी. आंबरे पा., शिवाजीराजे धुमाळ, कैलासराव वाकचौरे, विजयराव वाकचौरे, सीताराम भांगरे, सीताराम देशमुख, यशवंतराव आभाळे, रमेश देशमुख, आरिफ तांबोळी, विकास शेटे, प्रकाश नवले, अॅड. भाऊसाहेब गोडसे, गोरख मालुंजकर, परबत नाईकवाडी, सुधाकरराव देशमुख, बाळासाहेब भोर, प्रदीप हासे, राजेंद्र देशमुख, कैलास शेळके, भरत देशमाने, सुधीर शेळके, सयाजी देशमुख, रामहरी तिकांडे, गंगाराम लेंडे, सुशांत आरोटे, सुरेश नवले, भाऊसाहेब वाकचौरे, नितीन नाईकवाडी, प्रकाश नाईकवाडी, विष्णूपंत वैद्य, प्रकाश कोटकर, शांताराम संगारे, चंद्रकांत सरोदे आदींसह अनेक मान्यवर, शेतकरी सभासद, सर्व संचालक, कार्यकारी संचालक अजित देशमुख, सर्व विभाग प्रमुख, कामगार उपस्थित होते.
यावेळी माजी मंत्री पिचड म्हणाले की, अगस्ती चालु हंगामात 6 लाख मेट्रीक टनापेक्षा जास्त उसाचे गाळप करणार आहे. कार्यकारी संचालक देशमुख यांनी केलल्या सूचनांचे नियोजन करुन कार्यक्षेत्रात ऊस वाढीचा उपक्रम हाती घेतला आहे. मशिनरी नूतनीकरण व अद्यावत करत आहे. चालु हंगामात उत्पादन केलेली साखर निर्यात करुन चांगला भाव मिळवण्याचा प्रयत्न आहे. देशाचे नेते शरद पवार व केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी उसाचे उत्पादना बरोबर इथेनॅाल निर्मिती कारखान्यानी करावे, असे मार्गदर्शन केल्यानंतर आगस्तीनेही त्यांच्या मार्गदर्शनाने इथेनॅाल प्रकल्प मागील वर्षीच सुरु केला असुन चालु हंगामात 1 कोटी लिटर इथेनॅालचे उत्पादन करणार आहे.
ऊस वाढीसाठी पाण्याची गरज असते. आपण तालुक्यात पाण्याची उपलब्धता करुन दिली आहे. त्यामुळेच आज शेरणखेल सारख्या गावात निळवंडेची पाईपलाईन झाली व ऊसाचे उत्पादन वाढले. तसेच जाचकवाडी, खडकी, वाकी या गावातही ऊसाचे उत्पादन होत आहे. आता दर तीन वर्षांनी बियाने बदलली पाहिजे. एकरी ऊसाचे टनेज (उत्पादन) वाढले पाहिजे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अगस्ती चालविण्यासाठी संचालक मंडळाने स्वतःच्या नावावर कर्जे काढली आहेत. तज्ञ व्यक्तीची नेमणूक केली असून त्यांचे मार्गदर्शन घेणार असल्याचे ते म्हणाले.
भाव योग्य मिळत नसल्याने साखर उत्पादन करुन गोडावुनला ठेवावी लागते. बँकेच्या कर्जाचे व्याज भरावे लागते. त्यामुळे बँकांनीही सहकार्याची भुमिका घेऊन कारखान्यांना व्याजात सवलत दिली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करुन दिवाळीला उत्पादक सभासदांना 25 रुपये किलोने साखर दिली जाईल, असेही सांगितले. तसेच दिवाळी पूर्वी सभासदांना उसाचे पेमेंट करणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष सीताराम पा.गायकर यांनी अगस्ति करखान्यापुढील अडचणींचा आढावा घेतला. अगस्ती सहकारी साखर कारखाना हे अकोलेचे वैभव आहे. ते संभाळण्याचे काम आपल्याला करावे लागणार आहे. उत्पादक शेतकर्यांनी खुप कष्ट सहन केल्यानंतर अगस्तीची निर्मिती झाली आहे. अगस्तीच्या निर्मिती नंतर जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी चांगले भाव दिले आहे.
अगस्तीची नेहमी संगमनेरशी तुलना झाली. तरी अगस्तीने कधीही संगमनेर पेक्षा कमी भाव दिला नाही. आज पर्यंत कार्यक्षेत्रात पूर्ण क्षमते एवढा ऊसाचे उत्पादन झाले नाही. ज्यावेळी अगस्तीला संपूर्ण ऊस कार्यक्षेत्रात उत्पादित होईल त्यावेळी अगस्ती स्वयंपूर्ण होईल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. काही तरुण शेतकरी उसाचे चांगले उत्पादन घेत आहेत. उसाचे उत्पादन वाढले तर गेटकेनच्या उसाचा खर्च वाचनार आहे.
माजीमंत्री पिचड यांनी पाण्याचे नियोजन चांगले केले असल्याने तालुक्यात ऊस उत्पादन वाढले आहे. चालु हंगामात 6 लाख मे. टन पेक्षा अधिक गाळप करु, काटकसरीने कामकाज करुन तसेच इथेनॅाल प्रकल्पात 1 कोटी लिटर निर्मिती करुन त्यातून 15 ते 20 कोटी वाचवुन कमीत कमी तोंडालातोंड मिळवू अर्थात ना नफा ना तोटा असा चालु हंगाम पूर्ण करु असा विश्वास व्यक्त केला. तर अगस्तीवर अनेकांचे संसार अवलंबून असल्याने सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन श्री. गायकर यांनी केले.
यावेळी आमदार डॉ. लहामटे म्हणाले की, हंगाम सुरु होताना आज शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. कारखान्यात शेतकरी हिताचे व काटकसरीने काम करावे. शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम सुरु आहे.राजकारण जनतेच्या हिताचे झाले पाहिजे. कारखाना हे तालुक्याचे वैभव असून ही भाग्यलक्ष्मी टिकली पाहिजे. राज्यातील आपले महाविकास आघाडी सरकार शेतकरी हिताचे असल्याने राज्यातील साखर कारखाने अडचणीत आहेत. काही कारखाने बंदही पडली आहे. कारखाना बंद पडल्यास शेतकर्यांची काय अवस्था होते हे माहीत असल्याने उपमुख्यमंञी अजितदादा पवार व सरकारने कारखान्यांना मदत करण्याचे धोरण घेतले असल्याचे सांगितले. तसेच आयोजकांनी कार्यक्रमाला बोलवल्याबद्दल आभार मानले.
यावेळी योगी केशव बाबा यांनीही मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक प्रकाश मालुंजकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन मुख्य लेखापाल एकनाथ शेळके, केन मॅनेजर सयाजीराव पोखरकर यांनी केले. तर संचालक सुनिल दातीर यांनी आभार मानले.
Comments