समर्पण फाउंडेशनचे डॉ. करणसिंह घुले यांचे मत
नेवासा । वीरभूमी- 26-Oct, 2021, 12:00 AM
महाराष्ट्र राज्य इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई यांच्या वतीने सुरू झालेली मध्यान्ह भोजन योजना ही केवळ बांधकाम मजुरांच्या पैशाचा अपव्यय होणार आहे, असे मत समर्पण फाउंडेशनचे डॉ. करणसिंह घुले यांनी व्यक्त केले.
गेले एक तप नेवासा तालुक्यामध्ये बांधकाम मजूर व इतर मजुरांसाठी संघटनाचे काम करणार्या समर्पण फाउंडेशनने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सन 2011 पासून चालू असलेल्या सर्व योजनांमध्ये मंडळाकडून नोंदीत बांधकाम कामगारांची केवळ प्रतारणा होत आहे.
मंडळाच्या भोंगळ व नियोजनशून्य कारभारामुळे नोंदीत कामगारांना नूतनीकरण कधी करावे, हे देखील कळत नाही. मंडळाचे कर्मचारी पाच वर्षांचा शिक्का मारून देतात आणि त्यामुळे कामगारांची पाच वर्षांसाठी आपले नूतनीकरण झाले आहे, अशी समजूत होते.
हे सर्व कामगार त्यामुळे बाद झालेले आहेत. अशा बाद कामगारांचा प्रश्न गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा पाठपुरावा करूनही मंडळाला तो सोडवता आलेला नाही.
अनेक बांधकाम कामगार दुर्दैवाने वेगवेगळ्या कारणाने मृत झालेले आहेत. त्यांच्या वारसांना विमा, तर सोडा साधी अंत्यविधीसाठी असलेली रक्कमही अद्याप मंडळाने दिली नाही. नोंदीत बांधकाम मजुरांचे असंख्य प्रश्न व योजना या मंडळाकडे प्रलंबित असताना मंडळाने मध्यान्ह भोजन योजनेसारखी अतिशय कुचकामी अशी योजना राबवण्याचा निर्णय घेतला हे संतापजनक आहे.
जो कामगार कामावर जातो, तो आपल्या व कुटुंबाच्या पोटाची तजवीज करण्यासाठी जात असतो. जेवण हे कल्याणकारी मंडळाकडून मिळावे, अशी कधीही बांधकाम मजूर यांची अपेक्षा आम्हाला दहा वर्षांत काम करताना आढळून आली नाही.
Nice scieame