विविध मागण्या मान्य न झाल्याने संपाचा निर्णय । अकोले आगारात कर्मचार्यांची निदर्शने
अकोले । वीरभूमी - 28-Oct, 2021, 01:07 PM
अकोले । वीरभूमी -
आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी आज पहाटे 5 वाजल्यापासून एसटी महामंडळाचे सर्व कर्मचारी बेमुदत उपोषणास बसल्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल सुरू झाले आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी संयुक्त कृती समिती अकोले आगाराच्या वतीने आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांचे निवेदन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापिक संचालक यांना 19 ऑक्टोबर रोजी निवेदन दिले होते. त्या मागण्या पूर्ण केल्या नाहीतर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यावर राज्य परीवहन महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याने आज पहाटे 5 वाजल्यापासून परीवहनचे कर्मचारी उपोषणासाठी बसले आहेत.
कर्मचार्यांच्या प्रमुख प्रलंबित मागण्यामध्ये कर्मचार्यांना 28 टक्के महागाई भत्ता लागू करून तो मागील फरकासह अदा करण्यात यावे. मान्य केल्यानुसार घरभाडे भत्ता 7, 14, 21 टक्केवरून 8, 16, 24 टक्के पर्यंत वाढविण्यात यावे. वेतनवाढीचा दर मान्य केल्यानुसार 2 टक्क्यावरून 3 टक्के करण्यात यावा.
दिवाळी पूर्वी सण अग्रीम व उचल राज्य शासनाच्या 12500 रुपये देण्यात यावी. दिवाळीपूर्वी आगाऊ वेतन देण्यात यावे. रुपये 15000 दिवाळी भेट देण्यात यावी. या मागण्या पूर्ण न झाल्यास कर्मचार्यांमध्ये असंतोष निर्माण होऊन काही अनुचित प्रकार झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार राहील, असा गंभीर इशारा देण्यात आला. त्यामुळे राज्य शासन हे याबाबत काय भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
iwngqHzMp