शिक्षक भारतीने सुट्टी वाढविण्याची केली होती मागणी
अहमदनगर । वीरभूमी - 11-Nov, 2021, 10:30 AM
शालेय शिक्षण विभागाने शाळांच्या दिवाळी सुट्या 20 नोव्हेंबरपर्यंत वाढवल्या आहेत. पूर्वीच्या परिपत्रकानुसार या सुट्या 11 नोव्हेंबरपर्यंतच होत्या. 21 नोव्हेंबरला रविवार असल्याने आता 22 नोव्हेंबरपासूनच शाळा सुरू होतील, असे लेखी आदेश जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाने काढले आहेत.
दिवाळीची सुट्टी परिपत्रकाप्रमाणे 20 नोव्हेंबर पर्यंत देण्याबाबत शिक्षक भारती संघटनेच्या वतीने मागणी केली होती. या मागणीचे निवेदन शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप यांनी शिक्षण मंत्र्यांना दिले होते.
सुरुवातीला स्थानिक शिक्षणाधिकार्यांनी 1 ते 20 नोव्हेंबर अशी सुटी जाहीर केली होती. त्यानंतर शालेय शिक्षण विभागाने पुन्हा परिपत्रक प्रसिद्ध करत पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान दिवाळीची सुटी जाहीर केली. यानुसार 11 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार होत्या. मात्र, एक दिवस अगोदर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकार्यांनी शिक्षक व मुख्याध्यापकांनी केलेल्या मागणीची दखल घेऊन 20 नोव्हेंबरपर्यंत सुटी जाहीर केली.
तसेच दि. 21 रोजी रविवार असल्याने शाळा 22 नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्याबाबतचे परिपत्रक माध्यमिक शिक्षण विभागाने काढले. त्या पत्रकानुसार जिल्ह्यातील काही शाळांमध्ये दि. 11 व 12 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी राहील त्यांना आवश्यकतेनुसार मुख्याध्यापकांच्या अधिकारात बदली सुट्टी घेता येणार असल्याचे म्हटले आहे.
माध्यमिक शाळांना दि. 10 नोव्हेंबर पर्यंत सुट्टी जाहीर केली होती. यामुळे 11 नोव्हेंबरपासून शाळा नियमित सुरु राहतील असे आदेश दिले होते. मात्र या आदेशाला शिक्षक भारती संघटनेसह इतरांचा विरोध होता. याबाबत संघटनेच्यावतीने निवेदनही दिले होते.
या निवेदनाची दखल घेऊन दिवाळीच्या सुट्ट्या वाढवल्याचा दावा शिक्षक भारती संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे.
Comments