पाथर्डी । वीरभूमी - 25-Nov, 2021, 12:28 AM
प्रशासकीय उदासीनता, प्रभावी राजकीय नेतृत्वाचा अभाव यामध्ये अडकलेल्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था दिवसेंदिवस वाईट झाली आहे. या दुरावस्थेमुळे अनेक निष्पाप व निरपराध नागरिकांचा बळी घेणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 लवकर दुरुस्त व्हावा व आगामी काळात नागरिकांचे जीव वाचावे यासाठी आपल्या कार्यकर्तृत्वाने राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेले केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनाच साकडे घालत उपहासात्मक चरणपूजा करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी ही सहभागी झाले होते.
मनसेचे जिल्हाध्यक्ष देविदास खेडकर, तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ, मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाट, माजी नगराध्यक्ष अॅड. दिनकर पालवे, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सिताराम बोरुडे, योगेश रासने, नगरसेवक बंडू पा. बोरुडे, वंचित आघाडीचे भोरू म्हस्के, आर. के. चव्हाण, मनसेचे शहर सचिव संदीप काकडे, राजू गिरी, सोमनाथ फासे, लक्ष्मण डांगे, अशोक आंधळे, एकनाथ सानप, मनसेचे शेवगाव तालुकाध्यक्ष गणेश राधवणे आदी उपस्थित होते.
आजपर्यंत सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी व नेत्यांनी अनेक आंदोलने केली. मात्र यामध्ये कुठलीही प्रगती झाली नाही. राष्ट्रीय महामार्ग 61 च्या रखडलेल्या कामाबाबत सर्व हतबल झाले आहेत. आज अखेर मनसेच्या आयोजित केलेल्या अभिनव आंदोलनासाठी सर्वपक्षीय पदाधिकार्यांनी पाठिंबा दर्शवत यात सहभाग नोंदवला. आज सकाळी पाथर्डी शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील नाईक चौकात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची मंत्रोपचाराच्या जयघोषात विधीवत चरण-पूजा करण्यात आली.
या रस्त्याचे काम येत्या पंधरा दिवसात सुरळीत झाले नाही. तर नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील निवासस्थानी पुढील उपोषण करुन आंदोलन करणार आहे. या पलीकडे जाऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार डॉ. सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे फोटो मनसेचे कार्यकर्ते गळ्यात घालून भीक मांगो आंदोलन करणार आहे. या आंदोलनातील गोळा झालेल्या पैशातून महामार्गावरील पडलेले खड्डे बुजवण्याचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे.
यावेळी बोलताना देविदास खेडकर म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यावरून दळणवळण व खडतर प्रवासामुळे लोक या रस्त्यावरून जाणे टाळत आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पाथर्डी शहराची बाजारपेठ ओस पडू लागली आहे. तालुक्याच्या राजकारणाची आम्हाला त्याच्याशी काहीही घेणे देणे नाही. मात्र आमचा उद्देश साफ आणि सरळ आहे. तालुक्याच्या आर्थिक उन्नतीसाठी चालना देणारा, विकासासाठी महत्त्वाचा असणारा हा राष्ट्रीय महामार्ग मृत्यूचा सापळा झाला आहे.
लोकांच्या सुविधेसाठी हा रस्ता पूर्ण करावा अशीच आमची व सर्वसामान्य लोकांची माफक अपेक्षा आहे. रस्त्याचे काम सुरळीत होऊन व्यवस्थित झाल्यास आम्ही खासदार व आमदाराचा जाहीर सत्कार करू असेही खेडकर म्हणाले.
Comments