आजी-माजी आमदारांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
निवडणुकीत पारनेरचा पाणीप्रश्न ठरणार कळीचा मुद्दा
लतिफ राजे । वीरभूमी - 25-Nov, 2021, 02:16 AM
पारनेर : काल मंगळवार दि. 23 रोजी नगरपंचायतीच्या प्रारुप मतदार याद्या जाहीर झाल्यानंतर लगेचच दुसर्या दिवशी म्हणजेच बुधवार दि. 24 नोव्हेंबर रोजी निवडणूक आयोगाने अनपेक्षितपणे नगरपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करून आचारसंहिता लावल्याने सगळ्यांचीच भंबेरी उडाली आहे. 21 डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याने इच्छुक उमेदवारांकडे वेळ कमी असून शहरातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.पारनेर नगरपंचायतीमध्ये 17 प्रभाग असून नगरपंचायतीवर झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांना कंबर कसावी लागणार आहे. 2015 मध्ये झालेल्या पहिल्या नगरपंचायतीच्या निवडणुकीत पारनेर मध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेले नव्हते. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष यावेळी नगरपंचायतीची सत्ता स्वबळावर मिळवण्यासाठी पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार आहेत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांची महाविकास आघाडी जरी असली तरी मात्र पारनेरमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशीच हवा आहे. तसेच भाजपा व पारनेर शहर विकास आघाडी ही तयारीत असल्याने पारनेर मधील बर्याच प्रभागात तिरंगी किंवा बहुरंगी लढती होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
विधानसभेनंतर पारनेर नगरपंचायतीची होणारी निवडणूक ही पहिलीच मोठी निवडणूक असल्याने आ. निलेश लंके यांनी यावर विशेष लक्ष दिले आहे. मागील पाच सहा महिन्यांपासूनच आ. लंके यांनी विविध प्रभागातील उमेदवारांसाठी चाचपण्या सुरू केल्या असून सर्वच प्रभागात राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करण्याची तयारी केली आहे. पारनेरमध्ये राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन प्रमुख व तुल्यबळ पक्ष असून पारनेरमधील शिवसेनेची ताकद चांगली आहे.
प्राप्त माहितीनुसार शिवसेनेनेही 17 प्रभागातील उमेदवार जवळपास फायनल केले असून निवडणुकीच्या ‘कामाला लागा’ असे आदेश दिले आहेत. मागील निवडणूकीत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष होता. तसेच नगरपंचायत निवडणुकीत अनेक अपक्ष उमेदवारांनी विजयश्री खेचून आणली होती. त्यातील अनेकजण एकत्र येऊन पारनेर शहर विकास आघाडीच्या तयारीत असून त्यांच्याकडे ही 17 प्रभागातील उमेदवार तयार आहेत अशी माहिती आघाडीच्या प्रमुखांनी दिली आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष वसंत चेडे शहरातीलच असल्यामुळे भाजप ही या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यास इच्छुक असून वेळप्रसंगी खासदार विखेंकडून त्यांना रसद पुरवली जाऊ शकते.
मात्र आ. लंके यांच्या वाढत्या प्रभावामुळे पारनेरची सत्ता त्यांच्या ताब्यात जाऊ नये यासाठी शिवसेना-भाजप व शहर विकास आघाडी वेळप्रसंगी एकत्रित होऊन राष्ट्रवादीच्या विरोधात एकास एक उमेदवार देऊ शकतात, अशी चर्चा बर्याच ठिकाणी चालू आहे. माजी आ. विजय औटी यांनी पारनेर तालुका शिवसेना मेळाव्यात जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर तसेच जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांच्या समोर ‘आम्हाला घड्याळाला मत देण्यास सांगू नका’. असे सांगितल्याने पारनेरमध्ये तरी महाविकास आघाडीचा प्रयोग होणार नाही यात शंकाच नाही.
एकंदरीत पारनेर नगरपंचायतीची निवडणूक आजी- माजी आमदारांनी प्रतिष्ठेची केली असल्यामुळे संपूर्ण तालुक्याचे लक्ष पारनेर नगरपंचायत निवडणुकीकडे लागले आहे.
तसेच मागील वर्षी शिवसेनेच्या ज्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता त्या पाच नगरसेवकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवसेनेत घरवापसी केली होती. परंतु त्या नगरसेवकांना आता शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार की राष्ट्रवादीकडून मिळणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
Tags :
RcTaKWkL