अहवाल तर येवू द्या, आम्ही दोषी असलो तर शिक्षा भोगायला तयार
अगस्ती कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पा. गायकर यांचे विरोधकांना आव्हान । अगस्तीवरून आरोप-प्रत्यारोप
अकोले । वीरभूमी - 25-Nov, 2021, 07:25 AM
राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते ना. अजितदादा यांना मी स्पष्ट विचारले की, दादा तुम्ही अगस्ती बाबत कोणाला शब्द दिला का? दिला असेल तर मी थांबतो. तर ना. अजितदादा म्हणाले की, मी कोणालाही शब्द दिलेला नाही. उलट तुम्ही विचलित होऊ नका. तुम्ही व्यवस्थित अगस्ती कारखाना चालवावा, असे अगस्ति सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पा. गायकर यांनी सांगितले. तसेच कारखान्याच्या कारभाराची चौकशी चालू असून त्याचा अहवाल येऊ द्या, आम्ही दोषी असलो तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत. कोणीही विषारी प्रचाराला बळी पडू नका असे आवाहन त्यांनी सभासदांना केले.आज अगस्ती सहकारी साखर कारखाना येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक मिनानाथ पांडे,प्रकाश मालुंजकर, अशोक देशमुख, मच्छिंद्र धुमाळ, बाळासाहेब देशमुख, रामनाथ बापू वाकचौरे, गुलाबराव शेवाळे, महेश नवले, राजेंद्र डावरे, बाळासाहेब ताजने, कचरू पा शेटे, सुनील दातीर, कार्यकारी संचालक अजित देशमुख, मुख्य लेखापाल एकनाथ शेळके आदी उपस्थित होते.
सीताराम पा. गायकर म्हणाले की, काही सभासद हे वर्षभर अगस्ती संदर्भात अनेक चर्चा, अफवा व गैरसमज पसरवीत आहे.त्यामुळे सिझन चालू होतो की, नाही याबाबत सभासद, लेबर यांच्यामध्ये साशंकता होती.काही पार्ट पेमेंट बाकी होते. कर्मचार्यांचे पगार देणे बाकी होते. हे सर्व पेमेंट करण्यासाठी संचालक व काही विभाग प्रमुखांच्या नावावर 6 कोटी 11 लाख कर्ज काढले. जिल्हा बँकेकडून अल्प मुदत कर्ज मिळाल्यानंतर सर्व करार पूर्ण केले. असे असतानाही काही सभासदांनी संचालक मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
कर्जविषयी चर्चा करून सभासदांमध्ये गैरसमज पसरून दिले. या कर्जासंदर्भात अनेक वेगवेगळ्या पद्धतीने, वार्षिक सर्वसाधारण सभेतून विवेचन केले. स्पष्टीकरण दिले. त्यांचे भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे, हीन स्वरूपाचे असून त्यांच्याकडे सभासदांनी दुर्लक्ष करावे.गेली 25 वर्षे अगस्ती कारखाना चालविताना 1 लाख टन, दीड लाख टन, 3 लक्ष टन असे गाळप केले. त्यावेळी उत्पन्न कमी होते. मात्र पगार, मेंटनन्स, व्याज व इतर खर्च चालूच होते. त्यामुळे तोटा वाढत गेला. गाळप क्षमता वाढविण्याशिवाय पर्याय नव्हता म्हणून गेटकीनचा ऊस आणला. त्यावेळीही टीका केली. पूर्ण क्षमतेने कारखाना चालविला नाही तर तोटे वाढले असते.
अवकाळी पाऊस, दुष्काळी परिस्थिती याचाही परिणाम झाला. 10 वर्षपूर्वी राज्य सहकारी बँकेने कर्ज वाटप बंद केले. जिल्हा सहकारी बँक ही कर्ज देत नव्हती. अशाही परिस्थितीत कारखाना व्यवस्थित चालविला.अगस्ति कारखाना जिल्ह्या बँकेकडे घ्यावा असे आग्रह धरला. त्यामुळे अगस्तीला जिल्हा बँकेने मदत केली. तेव्हापासून अगस्ति व्यवस्थित चालू आहे.
त्यावेळी कामगारांचे पेमेंट, ऊस उत्पादकांचे पेमेंट, मटेरियल सप्लायर्सचे पेमेंट केले. त्यावेळीही आरोप केले की, गायकर तिकडे, चेअरमन इकडे, व्हा. चेअरमन म्हणून कर्ज काढून त्यात भ्रष्टाचार केला. ते काय किराणा मालाचे दुकान आहे का? वाटून घ्यायला. असा सवाल गायकर यांनी केला. त्यावेळी आम्ही राजीनामे दिले तर यांनी माघार घेतली. सुकाणू समितीची बैठक झाली. त्यांच्या सूचना विचारात घेण्याचे ठरले. तोटा कमी करण्याबाबत अॅक्शन प्लॅन केला. दशरथराव सावंत यांच्या घरी मीटिंग करून त्यांच्या शंकांचे निरसन केले. सर्व आर्थिक लेखाजोखा ठेवला. गेटकिनचा ऊस वाहतूकीचा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला. असे असून ही यांनी सभा चालू होऊन निंदा-नालस्ती, भ्रष्टाचाराचे आरोप केले. आम्हीही बाईट देऊन प्रत्युत्तर दिले असते परंतु आम्हाला वातावरण बिघडवायचे नाही.
एका बाजूला साखरेला उठाव नाही. व्याज चालू आहे. जमाखर्चाचा ताळमेळ बसविणे अवघड असताना जिल्हा बँकेने कर्ज दिले. 13 कोटी एफआरपी देण्यासाठी पतसंस्थेकडून कर्ज घेतले. कारखाना चालू ठेवला, याचा आनंद आहे. सर्व लेबर आलेले आहेत. 59 हजार साखरेचे पोते तयार झाले आहेत. साखर उतारा जिल्ह्यात 2 नंबरचा आहे. व्यवस्थापन चांगले काम करीत असून बाहेरचा ऊस पाहून आणला जात आहे. मार्च पर्यंत कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप होईल असे नियोजन केले आहे.
तालुक्यातील सर्व मंडळी हुशार आहे त्यांना सर्व समजते. तुम्ही कोणत्याही विषारी प्रचाराला बळी पडू नका. सार्वजनिक जीवनात असे आरोप करण्याची पद्धत कधीही पाहिली नाही. अनेक राजकीय संघर्ष केले. कम्युनिस्टांच्या चळवळी पाहिल्या. आम्ही टीका टिपण्णी करणार नाही. अगस्ती कारखान्याची चौकशी करण्याची मागणी 8 महिन्यांपूर्वी केली. अजितदादा, पवार साहेब यांच्याकडे तक्रार केली. चौकशी चालू आहे. त्यांचा अहवाल येऊ द्या, आम्ही भ्रष्टाचार केला असेल तर आम्ही शिक्षा भोगायला तयार आहोत.
शेतकरी संघटनेने शेतकर्यांना एफआरपी पेक्षा जास्त भाव देण्यासाठी कर्ज काढा पण भाव द्या, असा आग्रह धरला.कर्ज झाले तरी चालेल. असे म्हणतात. आम्ही कोणत्याही पक्षात असलो तरी त्यावेळी शेतकरी संघटनेला पाठींबा दिला. अजून कर्ज काढू. परंतु तालुक्याची कामधेनू मोडू देणार नाही. कारण अगस्ती मोडला तर पुन्हा उभा राहणार नाही. सर्व सभासदांना एफआरपी प्रमाणे भाव देऊ, सर्वांचे पेमेंट करू. कामगारांचे थकीत वेतन देणार आहोत. सर्वानी आरोपाकडे दुर्लक्ष करा, असे आवाहन श्री. गायकर यांनी केले.
आम्ही आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या बरोबर असल्याने काहींच्या पोटात दुखायला लागले आहे, अशी टीका सीताराम पा. गायकर यांनी केली.
संचालकांचा युरोप दौरा स्व-खर्चाने
अमित भांगरे यांनी संचालक युरोप दौरा करून आले. असा आरोप केला. त्याला संचालक गुलाबराव शेवाळे यांनी उत्तर देताना म्हणाले की, आम्ही कोणाचे लाभार्थी नाही आणि आम्ही काही भिकारी नाही. आम्ही तेव्हढे श्रीमंत असून संचालक असलो म्हणून आम्ही आमच्या स्व-खर्चाने कोठे जाऊ शकत नाही का? असा सवाल करीत आम्ही कारखान्याच्या खर्चाने गेलो असोत तर अमित भांगरे यांनी तसे सिद्ध करावे.
Tags :
Comments