अकोले । वीरभूमी- 26-Nov, 2021, 08:07 PM
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे तज्ञ संचालक म्हणून महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे अकोलेतील निष्ठावंत, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, सहकारातील ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांची निवड करण्यात आली आहे.
या निमित्ताने सहकार व शिक्षण क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व असलेल्या मधुकरराव नवले यांना जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळाली असून त्यांच्या या निवडीचे अकोले तालुक्यासह जिल्ह्यात स्वागत करण्यात आले आहे. अकोले तालुक्यातुन जिल्हा सहकारी बँकेवर श्री नवले यांच्यासह तीन संचालक म्हणून जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
आज अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष उदय शेळके यांचे अध्यक्षतेखाली संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत दोन स्वीकृत संचालकांची निवड करण्यात आली. यामध्ये महसूलमंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे अकोलेतील कट्टर समर्थक, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, सहकारातील ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले व जामखेड येथील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सांळुके यांची स्वीकृत संचालक म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी संचालक माजी आ. शिवाजीराव कर्डीले, व्हा. चेअरमन माधवराव कानवडे, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सीताराम पा. गायकर, संचालक सौ. अनुराधाताई नागवडे, अण्णासाहेब म्हस्के, गणपतराव सांगळे, अमित भांगरे यांचेसह सर्व संचालक उपस्थित होते.
अकोलेतील ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले यांची अहमदनगर येथे निवड जाहीर होताच अकोलेत कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष व्यक्त केला. तसेच कारखाना चौकात जोरदार स्वागत करत त्यांचा सत्कार केला.
यावेळी राज्याचे महसूलमंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी अकोलेतील सहकार व शिक्षण क्षेत्रात योगदान असलेले बुवासाहेब पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व अभिनव शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव नवले यांची जिल्हा सहकारी बँकेत स्वीकृत संचालक म्हणून निवड करुन जिल्ह्यात काम करण्याची संधी दिल्याबद्दल तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, बाळासाहेब नाईकवाडी, संपतराव कानवडे, विक्रम नवले, शिवाजी नेहे, अरीफभाई तांबोळी, रामदास धुमाळ, नगराध्यक्षा सौ.संगीताताई शेटे, अमोल नाईकवाडी, रमेश नाईकवाडी, रामदास शेटे, सौ.वनिता शेटे, प्रा.बाळासाहेब शेटे, भास्करराव दराडे आदींसह काँग्रेस कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले.
Comments