अकोले । वीरभूमी- 27-Nov, 2021, 10:32 PM
येथील जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे श्री कालभैरवनाथांची जयंती व दीपोत्सव सिद्धेश्वर मंदिर भक्त परिवाराच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली.
या निमित्ताने हजारो दिव्यांची रोषणाई, फुलांची मनमोहक सजावट देवालयाच्या सर्व परिसरात करण्यात आली होती. हजारो भाविकांनी व श्री स्वामी समर्थ सेवेकरी यांनी यावेळी दर्शन घेतले.
येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ श्री. काळभैरवनाथाचे अतिशय पुरातन मंदिर असून दरवर्षी त्यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यावेळी 2000 दिव्यांनी संपुर्ण परिसर उजळून गेला होता. तसेच यावेळी दिव्यांनी ओम आकाराची काढलेली रांगोळी ही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.
सर्व 2000 पणत्या प्रज्वलित झाल्यावर हे दृश्य पाहण्यासाठी अकोलेकरांनी व भाविकांनी गर्दी केली होती. हे दृश्य आपल्या डोळ्यात सामावून घेत असताना मोबाईलमध्ये फोटो घेण्याची स्पर्धाच जणू येथे पाहायला मिळाली. हा मनमोहक नजारा सर्व भाविक भक्तांना खिळवून ठेवताना दिसत होता.
भाविकांनी वर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. येथे गणपती, मारुती, आंबिका देवी, शनी महाराज, श्री कालभैरव नाथांची मुर्ती आहे.
यावेळी भाविकांनी श्री कालभैरव नाथ यांना हार, खडीसाखर, उदबत्ती व बाजरीची भाकरी, लाल लसणाची चटणी, कांद्याची पात टाकून वांग्याचे भरीत याचा नैवेद्य दाखवुन मानसन्मान केला. तसेच सर्वांनी एका तालासुरात 11 वेळा श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठण केले. आपल्या कुटुंबाचे संरक्षण करण्याची मनोभावे विनंती केली.
अकोले शहरातील अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर प्राचीन सिद्धेश्वर मंदिर असून इथे कालभैरवाचे स्वतंत्र मंदिर आहे. श्री कालभैरव हे महादेवांचेच रुद्रावतार असुन हे मुख्य क्षेत्रपाल दैवत आहे. आठ दिशांना मुख्य मुख्य आठ आठ क्षेत्र रक्षक भैरव देवता असुन या 64 भैरवांचे मुख्य अधिनायक दैवत म्हणजेच श्रीकालभैरवनाथ हे होय. गावाचे व भाविकांचे सरंक्षण करणारे हे मुख्य कोतवाल दैवत आहे.
श्री कालभैरवनाथांच्या सेवेत त्यांना विशेष शुद्धजलधारांचा रुद्रभिषेक अतिप्रिय आहे. श्री कालभैरवाषटक स्तोत्राचे नित्यनियमित पठणाने विशाल किर्ती प्राप्त होते. काशी क्षेत्री वास करुन पुण्य अर्जित करण्याचे पुण्य लाभ होतो. धर्म नीतीने वागण्याची बुद्धी-धैर्य तथा तशी परिस्थिती प्रतिकूल होते. श्री. काळभैरवनाथांचा महिमा जे वाचतील किंवा श्रवण करतील त्यांना बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडेल अशी आख्यायिका आहे.
कालभैरव नाथजयंती उत्सव व दीपोत्सव यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब पेटकर, संजय भुजबळ, प्रा. सुनील वलवे, पुजारी योगेश अगस्ते, सचिन भालेराव, प्रशांत कोळपकर, सौरभ भांगरे, अभिजित घुले, प्रा. गोपाल बुब, योगेश नाईकवाडी, अमित नाईकवाडी आदींनी परीश्रम घेतले. यावेळी सर्व भाविकांना 51 किलोचे लाडू चा प्रसाद समाजसेवक व भाविक संजय भुजबळ यांनी भाविक भक्तांना वाटला.
Comments