वाढत्या तापमानामुळे भविष्यात दुष्काळ पडणार नाही
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक । कासार पिंपळगाव येथे कृषीमित्र गुळ उद्योगाचा शुभारंभ
तिसगाव । वीरभूमी - 29-Nov, 2021, 11:12 PM
जागतिकीकरण वेगाने वाढत आहे, त्याच प्रमाणात पृथ्वीचे तापमानही वाढत आहे. वाढत्या तापमानामुळे पावसाचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे भविष्यात दुष्काळ पडणार नाही. मात्र वाढत्या तापमानामुळे पावसाबरोबरच गारपीटीचे प्रमाण वाढले आहे. हा भविष्यातील धोका असून पृथ्वीचे तापमान नियंत्रणात ठेवावे लागणार आहे. तापमान नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करावी. प्रत्येकाने स्वतःसह आप्तेष्टांच्या वाढदिवसानिमित्त एका वृक्षाची लागवड करून त्यांची जोपासना करावी, असे आवाहन हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी केले.पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे सनग्लोरी ऑरगॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनीच्या ‘कृषीमित्र गुळ उद्योगाच्या गाळप हंगामाचा शुभारंभ प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक व हनुमान टाकळी येथील श्री समर्थ हनुमान देवस्थानचे अध्यक्ष प.पू. रमेश अप्पा महाराज यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव राजळे हे होते. यावेळी अॅड. अतुल दिक्षित, पुणे येथील जनाई-मुक्ताई यशोगाथा मंचच्या अध्यक्षा अनिताताई दिक्षित, पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी पालवे, अॅड. वैभवराव आंधळे, ह.भ.प. दत्तात्रय महाराज राजळे, ह.भ.प. भाऊपाटील राजळे महाराज, सेवा निवृत्त पोनि. मुक्ताजी भगत, कासार पिंपळगाव सेवा सनस्थेचे माजी अध्यक्ष संभाजी राजळे, सेवा निवृत्त मुख्याध्यापक डी. व्ही. म्हस्के, स्वाभिमानी संघटनेचे बाळासाहेब गर्जे आदी उपस्थित होते.
यावेळी हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक म्हणाले की, मी शेतकरी असल्याने शेतकर्यांच्या व्यथा माहित आहेत. शेतकर्यांना आजपर्यंत कुणीही पावसाचा खरा अंदाज सांगितला नाही. यामुळे पीक काढणीला आले की, पाऊस येतो व नुकसान करून जातो. जसा निसर्ग शेतकर्यांच्या पाठीशी हातधुवून लागला आहे. जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी काबाड कष्ट करून शेती फुलवतो व निसर्ग ते हिरावून घेतो. यामुळे वडीलांपासून प्रेरणा घेऊन इयत्ता आठवीत असल्यापासून हवामानाचा सखोल अभ्यास करून खरा अंदाज वर्तविण्यास सुरुवात केली.
यापुढे पंधरा दिवस अगोदर हवामानाचा अंदाज देऊन बळीराजाचे नुकसान होवू देणार नाही, हेच एकमेव ध्येय आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांना भेटून कमी दिवसात येणार्या वाणांचे बियाणे तयार करण्यास विनंती केली. या विनंतीनुसार कमी कालावधीत येणार्या पिकांचे बियाणे तज्ज्ञांनी तयार केले असून याचा शेतकर्यांना फायदाच होणार आहे.
लॉकडाऊनच्या काळात जगातील सर्व कंपन्या, उद्योगधंदे बंद पडले होते. मात्र एकमेव बळीराजाची कंपनी असलेली शेती बंद पडली नाही. शेतकर्याने लॉकडाऊनच्या काळात दूध, भाजीपाला, फळे, अन्नधान्याचा पुरवठा करून प्रत्येकाला जीवंत ठेवले. बळीराजा सर्वांना पोसण्याचे काम करत आला आहे आणि यापुढेही ते करतच राहणार आहे. यामुळे बळीराजा हा राजा आहे आणि राजा राहणार, असा विश्वास पंजाबराव डक यांनी व्यक्त केला.
आपल्या सुमारे सव्वा तासाच्या मनोगतात हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी उपस्थितांना पाऊस येण्याची वेळ कशी ओळखावी, पीकपेरणी कधी करावी, गारपीट कधी आणि कोणत्या भागात होते. आकाशातून पडणार्या वीजेपासून संरक्षण कसे करावे याबाबत शास्त्रीय माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषीमित्र संदीप राजळे यांनी केले. सूत्रसंचलन गोरख राजळे यांनी केले तर शोभा राजळे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी म्हातारदेव राजळे, विजय राजळे, विवेक राजळे यांनी परिश्रम घेतले.
हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी भाषणाच्या सुरुवातीस दि. 30 पर्यंत हवामान कोरडे राहणार असून दि. 1 व 2 डिसेंबर रोजी जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तविला. हा पाऊस काही शेतकर्यांना नुकसानदायक तर काही शेतकर्यांना फायदा होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर दि. 3, 4 रोजी दव पडणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.
TgeNQciDGJXORyMI