नातेवाईकांचा आरोप । चिठ्ठीत नावे असलेल्यांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्णय
शेवगाव । वीरभूमी- 30-Nov, 2021, 02:40 PM
शेवगाव तहसील कार्यालयाच्या मुख्य गेट समोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळलेल्या भाऊसाहेब घनवट याच्या खिशामध्ये एक चिठ्ठी आढळली आहे. तसेच मृतदेहाच्या शरिरावर मारहाणीच्या खुणा आढळल्या असल्याचे सांगत ही आत्महत्या नसून हत्या आहे. असा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे.
यामुळे संबधितांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे. यामुळे त्या चिठ्ठीमध्ये कोणाची नावे आहेत? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.
आज मंगळवारी सकाळी शेवगाव तहसील कार्यालयाच्या गेट समोर असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत भाऊसाहेब घनवट (रा. नजिक बाभूळगाव) याचा मृतदेह लटकतांना आढळून आला होता. या घटनेची माहिती शेवगाव पोलिसांना समजताच घटनास्थळी धाव घेत मृतदेह खाली उतरून उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.
याबाबतची माहिती मयताच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली. त्यानंतर नातेवाईकांनी थेट शेवगाव पोलिस ठाणे गाठत ही आत्महत्या नसून हत्या आहे. भाऊसाहेब घनवट याच्या शरिरावर मारहाणीच्या जखमा असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या खिशात चिठ्ठी आढळली असून त्यामध्ये ज्यांची नावे आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करा. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेतली.
तसेच काहींनी सांगितले की, भाऊसाहेब घनवट याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या मोबाईलमध्ये ‘सर्व काही मोबाईमध्ये’ असे स्टेटस ठेवले असल्याने तो मोबाईल तपासावा अशी मागणी केली.
या सर्व प्रकारामुळे भाऊसाहेब घनवट याने आत्महत्या केली असून त्याची हत्या झाली का? त्याच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीमध्ये कोणाची नावे आहेत. त्याला मारहाण झाली होती का? त्याने स्वतः गळफास घेतला की, त्याला मारून झाडाला लटकवण्यात आले? असे विविध प्रश्न उपस्थित होत असून पोलिस कसा तपास करतात, याकडे लक्ष लागून राहीले आहे.
Comments