जिरेवाडी शाळेला ग्रामस्थांनी ठोकले टाळे
पाथर्डी । वीरभूमी - 05-Dec, 2021, 10:05 AM
तालुक्यातील जिरेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक सतत गैरहजर राहत असल्याच्या कारणामुळे चिडलेल्या ग्रामस्थांनी आज (शनिवारी) शाळेलाच टाळे ठोकले. यावेळी ग्रामस्थ व पालकांचा संतापाचा उद्रेक होऊन सुमारे दोन तास शाळा बंद ठेवली. सकाळी सात वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत विध्यार्थी वर्गाबाहेरच होते.
तिन शिक्षक असणार्या या शाळेत दररोज एकच शिक्षक येतात. मात्र, ते ही उशिरा येत असल्याचे लक्षात आल्यानंतर ग्रामस्थांनी थेट वर्गाला टाळे ठोकले. तर उशीरा आलेल्या शिक्षकाला चांगलेच सुनावले. चूक मान्य करत संबंधीत शिक्षकांने बर्याच कालावधीनंतर शाळा सुरु केली.
शनिवारी सकाळी सात वाजता शाळेची वेळ असून नऊ वाजेपर्यंत एक ही शिक्षक हजर नव्हता. संबंधीत शिक्षक कोरडगाव येथे हॉटेलमध्ये गप्पा मारत बसतात. एक शिक्षक स्वतःची खासगी शिकवणी असून त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेकडे दुलर्क्ष करतात.नागरिकांना शाळा सोडल्याचे दाखले घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात.
संबंधित शिक्षकांवर राजकीय दबावामुळे कारवाई होत नाही. करोना काळात ही या शाळेतील एकही विद्यार्थ्यांचे एक दिवसही ऑनलाईन क्लास घेतले नाही. अशीही खंत ग्रामस्थांनी बोलून दाखवली.
यावेळी जिरेवाडी येथील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रवींद्र आंधळे, सरपंच उमाजी पवार, माजी उपसरपंच राजेंद्र आंधळे, भीमा आंधळे, ग्रामपंचायत सदस्य नारायण आंधळे, विलास बडे, बंडू आंधळे, विकास बटुळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments